Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यातील 125 शाळांमधील मुली थ्रो-बॉल खेळणार, 125 शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय थ्रो-बॉल प्रशिक्षण, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन,किशोरवयीन मुलींसाठी थ्रो-बॉल खेळ राबविणारा बीड ठरला पहिला जिल्हा”

  बीड जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामधील 125 शाळांमध्ये मुली थ्रो-बॉल खेळणार. किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळ राबविणारा बीड पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी थ्रो-बॉल आणि जाळी (नेट) शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या मार्फत १२५ शाळांच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्त केलेले आहे.

बालविवाहाला नकार देण्यासाठी बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या नेतृत्वातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता अकरा तालुक्यातील 125 शाळांमध्ये मुली थ्रो-बॉल खेळणार.
रत्नदीप चॅरिटी ट्रस्टचे राजीव मेहता यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना थ्रोबॉल आणि जाळी (नेट ) भेट स्वरूपात देण्यात आले.

युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन (एसबीसी थ्री) या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या संशोधनानुसार थ्रो-बॉल हा खेळ खेळल्याने मुलींची शारीरिक प्रकृती सुदृढ आणि सशक्त होत असल्याच्या निष्कर्षातून सिद्ध झाले आहे. त्यासाठीच थ्रो-बॉल देण्यात आले आहे.

यानिमित्ताने मुली दररोज किमान एक तास मैदानावर खेळतील यामुळे त्यांची शारीरिक प्रकृती अधिक सुदृढ आणि सशक्त होईल. त्यांची उंची वाढेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातील आत्मविश्वास द्विगुणीत होईल. या सर्वांचा परिणाम ‘बालविवाहला नकार’ देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण करणे हे होय. प्रथम टप्प्यात 125 शाळांना थ्रोबॉल आणि नेट देण्यात आलेले असून उर्वरित शाळांना पुढील टप्प्यात वितरित केले जातील.
आज दि. 03/01/2024 रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, बीड येथे जिल्ह्यातील 125 शिक्षकांचे जिल्हास्तरीय थ्रो-बॉल प्रशिक्षण संपन्न झाले या प्रसंगी मा. दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी,बीड, श्री. नागनाथ शिंदे, शिक्षणाधिकारी (प्रा/मा/यो), जिल्हा परिषद, बीड व श्री. चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी,बीड हे उपस्थित होते, प्रशिक्षक म्हणून शिवराज जायभाये, सहशिक्षक, निरगुडी व नंदकुमार गिरी, सहशिक्षक,डोंगरकिन्ही यांनी काम पाहिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वि.भा. साळुंखे यांनी केले तर आभार श्री.रंगनाथ राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम. सोनिया हांगे, श्री. विठ्ठल राठोड, श्री. राहूल चाटे, श्री. जितेंद्र आराक, परमेश्वर पवार इ. परिश्रम घेतले.

Exit mobile version