Site icon लोकाशा-बंब न्यूज

उद्या बीडमध्ये जरांगेंची तोफ धडाडणार, बंब मैदानावरील सभेला एकवटणार मराठ्यांचे वादळ, जरांगेंच्या ईशार्‍याकडे सरकारसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष,आयोजकांनी सभेचे तगडे नियोजन आखले  


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : राज्य सरकारला मराठ्यांनी दिलेलं अल्टिमेट दि. 24 डिसेंबर रोजी संपत आहे, त्यापूर्वी निर्णायक इशारा सभेच्या माध्यमातून इशारा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये डेरेदाखल झाले असून बीडमधील उद्या दि. 23 डिसेंबरच्या सभेला मराठवाडा आणि राज्यातून तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त समाज बांधव अबालवृद्ध उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. येणार्‍या समाज बांधवांसाठी पार्किंगपासून आरोग्य सेवेपर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. बीड-सोलापुर महामार्गावरील बंब मैदानात मनोज जरांगे पाटील यांची आज दुपारी दोन वाजता जाहीर इशारा सभा होत आहे. त्यापूर्वी शुक्रवारी सकाळी या बंब मैदानातच समाज बांधवांनी पत्रकार परिषद घेत सभेच्या नियोजनाची माहिती दिली.
आयोजक म्हणाले, की, निर्णायक इशारा सभेच्या माध्यमातून इशारा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल झाले आहेत. सभा घेण्याचे ठरल्यापासून समाज बांधवांनी बीड जिल्ह्यासह संभाजीनगर, धाराशीव, जालना, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून 10 लाखापेक्षा जास्त मराठे उपस्थित राहतील. सभेसाठी शंभर एकर जागा आरक्षीत ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. सभास्थळी 300 क्विंटल तांदळाची तर शंभर क्विंटल शाबूदाना खिचडी व फळांची अन्य समाजाने व्यवस्था केली आहे. एक लाख पाणी बॉटल सभास्थळी असणार असून 1200 पेक्षा अधिक स्वयंसेवक आज प्रत्यक्ष नियोजनात असणार आहेत. ही सभा अधिक शांततेने, संहितेने संपन्न होणार असून या सभेला अधिक अधिक संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान उद्या सकाळी 10 वाजता जरांगे पाटील बीड शहरात येतील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जरांगे यांची रॅली निघेल, ती सुभाष रोड मार्गे पुढे कुच करेल. रस्त्यामध्ये मुस्लिम समाज बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात येईल. पुढे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील, पुढे ही रॅल छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाण येईल तेथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते दर्शन घेतील. तशी ही रॅली बार्शी रोडने पुढे सभास्थळाकडे निघेल. बार्शी नाक्याच्या पुढे मुस्लिम बांधवांच्या वतीने पुन्हा एक सत्कार होईल आणि दुपारी दोन वाजता मनोज जरांगे पाटील हे बंब मैदानावरील सभास्थळी येणार आहेत.

आज बीडमधील शाळा राहणार बंद
उद्या दि. 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होत आहे. या सभेच्या अनुषंगानेच बीड शहरातील शाळा आजच्या दिवस बंद ठेवण्याची विनंती आयोजकांनी शिक्षण विभागाकडे केली होती, त्यानुसार शिक्षण विभागानेही आज बीडमधील शाळा बंद ठेवण्याच्या सुचना सर्व मुख्याध्यापकांना केल्या आहेत.

जरांगेंवर हॅलीकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी
आक्षरणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे यांना मराठा योध्दा म्हणून संबोधले जात आहे. यामुळेच त्यांचे जेसीबीव्दारे फुले उधळून स्वागत करताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. बीडमध्ये मात्र याच्याही पुढे जावून जरांगे पाटलांवर हॅलीकॉप्टरने पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

सभेसाठी तगडा बंदोबस्त
उद्या बीडमध्ये जरांगेंची ईशारा सभा होत आहे. ही सभा अत्यंत शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यानुसार एक अप्पर पोलिस अधीक्षक, चार पोलिस उपाधिक्षक, 8 पोलिस निरीक्षक, 70 एपीआय, पीएसआय,560 पोलिस अंमलदार, 600 होमगार्ड नेमले आहेत. सोबत मदतीला पाच दंगल नियंत्रक पथके, दोन क्यूआरटी पथके आणि एसआरपीएफचे 300 जवान तैनात करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवण्यासाठी व वाहतूक नियमन इत्यादीकरिता तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सभेच्या ठिकाणी व सभेच्या परिसरात एक ड्रोन कॅमेरा व दहा वेब कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

Exit mobile version