Site icon लोकाशा-बंब न्यूज

आता जिल्हाधिकार्‍यांनी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचा अधिकार दिला तालुकास्तरावर


बीड : दि.13: कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यासाठी लागणारी माहिती तालुका स्तरावरुन प्राप्त होण्यास विलंब होतो, त्यामुळे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यास उशीर होऊ नये यासाठी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कंटेनमेंट झोन तात्काळ जाहीर होण्यासाठी तालुकास्तरावर अधिकार देण्यात आला आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी जिल्ह्यात दररोज 100 च्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे असा अहवाल सादर केला आहे त्यामुळे याबाबतची नियमावली तयार करण्यात आली असून निर्गमित करण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर शहरी भागातील कंटेनमेंट झोन स्थान निश्चितीबाबत कार्यवाही मुख्याधिकारी, नगरपरिषद त्यांनी करावी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना कंटेनमेंट झोन बाबत तात्काळ कळवावे. यासाठी स्थानिक पोलिस निरीक्षक यांची मदत प्रत्येक वेळी घ्यावी. ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोन स्थान निश्चितीबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी कंटेनमेंट झोनबाबत कार्यवाही करावी. कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी तहसीलदार यांना विनाविलंब द्यावी. त्यानुसार तहसीलदार यांचे कंटेनमेंट झोन घोषित करण्याचे आदेश व कालावधी संपल्यानंतर नियमाप्रमाणे शिथील आदेश देण्यात येणार आहेत. प्रभावीपणे, कार्यक्षमतेने व्यवस्थापित करता यावे यासाठी निवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत इमारतीत समूह, गल्ली वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेनमेंट झोन असे क्षेत्र असू शकेल, या पेक्षा मोठे क्षेत्र संपूर्ण तालुका किंवा नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र इत्यादी झोन घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावा. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रोगप्रतिबंधात्मक फायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे, त्यातील पोट कलम 2(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये मनाई आदेश दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आलेे आहेत.

Exit mobile version