Site icon लोकाशा-बंब न्यूज

हिंसाचार प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही, कठोर कारवाई करणार, तपासासाठी दोन दिवसात एसआयटी नेमणार, फडणवीसांची विधान सभेत घोषणा, आणखी 101 आरोपींच्या हातात बेड्या पडणार

नागपूर दि.15(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी जो हिंसाचार झाला त्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. मात्र तरीही सभागृहाची इच्छा म्हणून या हिंसाचाराच्या तपासासाठी दोन दिवसात एसआयटी स्थापन केली जाईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी केली. हिंसाचार प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल कोणातालही सोडणार नाही, दया दाखविण्याची ही वेळ नाही असेही फडणवीस म्हणाले.
बीडमधील हिंसाचाराच्या संदर्भाने आ.संदीप क्षीरसागर, आ.रोहित पवार, आ.जयंत पाटील आदींच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना फडणवीस यांनी पोलीस कारवाईत कमी पडले असले तरी उपलब्ध पोलीस बळानुसार आणि त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय घेतले असे सांगत पोलीस दलाची पाठराखण केली. या प्रकरणात आतापर्यंत 278 आरोपी अटक झाले असून आणखी 101 आरोपी फरार आहेत त्यांनाही पकडले जाईल. आपण कोणालाही सोडणार नाही. ज्यांना अटक केली आहे त्यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. आणि जर यातूनही एखादा निष्पाप अटक झाला असेल तर त्याच्याबद्दल वेगळा विचार केला जाईल मात्र हल्लेखोरावर दया दाखविण्याची ही वेळ नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. येत्या 2 दिवसात या तपासाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली जाईल अशी घोषणा देखील फडणवीस यांनी केली.

Exit mobile version