Site icon लोकाशा-बंब न्यूज

आता स्वा.रा.ती.मधील शस्त्रक्रिया गृह, स्त्रीरोग व सर्जरी विभाग होणार अत्याधुनिक, खा. प्रीतमताईंनी आणला 22 कोटी 77 लाख रूपयांचा निधी, निधी मंजूर केल्याबद्दल ताईंनी राज्य सरकारचे मानले आभार



बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रियागृह आणि स्त्री रोग व सर्जरी विभाग आता अत्याधुनिक होणार आहे. यासाठी जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून तब्बल बावीस कोटी सत्तर लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. याबद्दल ताईंनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
बीड जिल्ह्याचा प्रश्‍न छोटा असो की मोठा जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे ह्या नेहमीच ते प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करतात, विशेष म्हणजे त्या स्वत: डॉक्टर असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्याचेही प्रश्‍न तातडीने मार्गी लागत आहेत. त्यांनी लावून धरलेल्या मागणीमुळेच अंबाजोगाईच्या स्वरातीसाठी राज्य सरकारने तब्बल 22 कोटी 77 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्राप्त निधीमुळे स्वा.रा.ती रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह अत्युच्च दर्जाचे होणार आहे. तसेच सर्जरी विभाग आणि स्त्री रोग विभागातील रुग्णसेवेचा दर्जा देखील उंचावणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या रुग्णालयाचे आधुनिकीकरण करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल खा. मुंडेंनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत. याशिवाय यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेही जिल्ह्यातून खा. प्रीतमताईंच्या कामाचे भरभरून कौतूक केले जात आहे.

पुणे, मुंबईच्या धर्तीवर होणार
अंबाजोगाईत शस्त्रक्रिया
राज्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात किचकट शस्त्रक्रियाचे रुग्ण पाठविण्याची वेळ येत होती. परंतु, स्वारातीचे शस्त्रक्रिया गृह उच्च दर्जाच्या यंत्रसामग्रीसह तयार होणार असल्याने जंतुसंसर्ग कमी होऊन दुर्बिणीद्वारे होणार्‍या शस्त्रक्रिया, न्यूरोसर्जन शस्त्रक्रिया यासह इतर शस्त्रक्रिया महानगरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाप्रमाणे अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातही करणे शक्य होणार असल्याचे स्वाराती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version