Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात उद्योगाला मिळणार बळ, उद्या बीडमध्ये होणार मध्यम, लघु आणि सुक्ष्म उद्योग परिषद, जिल्ह्यातील उद्योग वाढीला जिल्हाधिकारी देणार नवी दिशा


बीड दि. 22, (जिमा का) : येणार्‍या काळात जिल्ह्यात उद्योगाला मोठे बळ मिळणार आहे. याच अनुषंगाने उद्या दि. 24 नोव्हेंबर रोजी बीडमध्ये मध्यम, लघू आणि सुक्ष्म उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात उद्योगाला प्रोत्साहन देण्यासंदर्भातील रोड मॅपवर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ या स्वत: बोलणार आहेत. उद्योगात जागरूकता प्रज्वलित करणे, उद्योजकता जोपासणे आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. भविष्यात नक्कीच या परिषदेचा जिल्ह्यातील अनेकांना फायदा होवून नव नवे उद्योग करण्यासाठी बळ मिळेल असा विश्‍वास वाटत आहे.
उद्योग संचनालय यांच्यावतीने  मध्यम, लघु आणि सुक्ष्म उद्योग परिषद शुक्रवारी हॉटेल ग्रँड यशोदा, बार्शी रोड येथे आयोजीत करण्यात आली आहे. या परिषदेसाठी नोंदणी सकाळी 9.30 ला सुरूवात होणार आहे. या  परिषदेचे महत्व सांगुन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे या बीड जिल्ह्यातील मध्यम, लघु आणि सुक्ष्म उद्योग (एमएसएमई) यांना प्रोत्साहन देण्यासंदर्भातील रोड मॅपवर बोलणार आहेत. या परिषदेला विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्र कुशवाह यांच्यासह इतर मान्यवर व्यक्तयांचे यावेळी मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. ही परिषद जिल्हा उद्योग केंद्राचे जॉईट डायरेक्टर बी.टी. यशवंते आणि बीड जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर के. जी. तांदळे यांनी आयोजित केलेली आहे. सदर परिषद सांयकाळी 5.30 पर्यंत चालणार आहे. अधिकाधिक भावी उद्योजकांनी या परिषदचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version