Site icon लोकाशा-बंब न्यूज

अबब..! बीडच्या आरटीओलाच दिली बनावट पीयुसी, तिघांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : बीडच्या आरटीओलाच बनावट पीयुसी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकतेच काही दिवसांपूर्वी अतिप्रदुषणामुळे दिल्लीमधील शाळा, कॉलेजेस बंद केले होते. यामुळे प्रशासनाने प्रदुषणाला कारणीभूत ठरणार्‍या व धुराच्या धुळकंड्या सोडणार्‍या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले होते. महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांत वाहनांची तपासणी न करताच वाहनाला पी.यु.सी प्रमाणपत्र दिले जाते. या पी.यु.सी केंद्राची कोणतीही तपासणी व त्यांना नियमांचा कसलाही धाक नसल्याने व्हाटस् अँप फोटोवरून पी.यु.सी ही योजना राज्यभर चालू असल्याचे दिसते.महाराष्ट्र आरटीओचे अपर परिवहन आयुक्त यांनी अशा बोगस/बनावट पीयूसी चालकांवर तपासण्या करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. याबाबद सविस्तर माहिती अशी की, त्याअनुषंगाने बीडचे आरटीओ अधिकारी गणेश विघ्ने यांनी स्वतः ग्राहक बनून बर्‍याच ठिकाणी अशा पीयुसी सेंटरवर ग्राहक बनून बनावट पीयुसी घेतल्या. गाडी चक्क बीडमधील वजनकाट्यावर आणि 100 किलोमीटर दुरून त्याच वेळी पीयुसी वाहनास व्हाटस् अँप वरून फोटो व पैसे घेऊन पीयुसी दिली. याबाबतचे व्हिडिओ सहीत स्टिंग ऑपरेशन गणेश विघ्ने यांनी केले.गुन्हा सिद्ध होण्यासाठी वाहनाचा वजनकाटा इनकॅमेरा केला. त्या अनुषंगाने पाठळशिंगी टोलनाक्यावरील या बनावट पीयुसी देणार्‍याविरोधात वाहन क्रमांक चक04कझ1821,चक11ढ7927 व चक23ए9319 यांना बनावट पीयुसी दिल्याने बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पीयुसी केंद्र चालक परमेश्वर मेंडके ,करण घोडके,राहुल घोडके यांच्यावर भा.दं.वि मधील कलम 420,34,468,471 मधील कलमानुसार शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version