Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडसह राज्यातील 19 हजार कलाकार अजित दादा गटाला ठोकणार रामराम, लवकरच राष्ट्रवादी चित्रपट साहित्य कला संस्कृती संघटना कलाकारांसह जाणार शरद पवार गटात, कलाकारांचे प्रश्‍न सुटत नसल्यामुळे कलाकार अजितदादा गटाची सोडणार साथ


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : बीडसह राज्यातील 19 हजार कलाकार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या गटाला रामराम ठोकणार आहेत. सध्या त्यांच्यासोबत असलेली राष्ट्रवादी चित्रपट साहित्य कला संस्कृती ही संघटना तब्बल 19 हजार तळागाळातील कलाकारांसह लवकरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गटासोबत जाणार आहे. नॉन कलाकार माणसाच्या हातात कारभार दिल्यामुळे कलाकारांचे प्रश्‍न सोडविण्यास अजित दादा गटाला पुर्णपणे अपयश येत आहे. त्यामुळेच आपल्या संघटनेसह तळागाळातील 19 हजार कलाकार अजित दादा गटाची साथ सोडून ते शरद पवार गटात जाणार असल्याचे समोर येत आहे. यामुळे भविष्यात अजित दादा गटाला मोठा फटका बसणार आहे.
राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाचा थेट परिणाम पक्षावर होत आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही दोन गट पडले. या दरम्यान अजित दादा गटासोबत अनेक जण गेले होते. यामध्ये राष्ट्रवादी चित्रपट साहित्य कला संस्कृती या संघटनेचाही समावेश होता, बीडसह तब्बल 19 हजार कलाकारांना आपल्या सोबत घेवून राष्ट्रवादी चित्रपट साहित्य कला संस्कृती या संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष सिनेअभिनेते सुधिर निकम हे अजित दादा गटात सहभागी झाले होते, मात्र यावेळी अजित दादांनी चुकीचा निर्णय घेवून संघटनेची धुरा म्हणजे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद बारामतीच्या बाबा पाटलांकडे दिले. बाबा पाटील हे नॉन कलाकार आहेत, त्यामुळे त्यांना कलाकारांच्या प्रश्‍नांचे थोडेही देणे घेणे नाही, त्यांच्या जागी सिनेअभिनेते विजय पाटकर यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करावी, अशी मागणी कलाकारांची होती, पाटकरांमुळे कलाकारांचे प्रश्‍न तात्काळ मार्गी लागले असते, मात्र अजित पवारांना फक्त आणि फक्त राजकारणच करायचे होते, ते राजकारण कलाकारांच्या याही संघटनेत करण्यात आले, अजित पवारांसह तटकरे, धनंजय मुंडे यांनाही कलाकारांचे प्रश्‍न सोडविता येत नसल्यामुळे राष्ट्रवादी चित्रपट साहित्य कला संस्कृती ही संघटना आणि या संघटनेबरोबर तब्बल 19 हजार तळागाळातील कलाकार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गटामध्ये दाखल होणार आहेत. यासंदर्भात सिनेअभिनेते डॉ. सुधिर निकम यांची डॉ. नरेंद्र काळे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे डॉ. निकम हे काही कलाकारांना आपल्या सोबत घेवून शरद पवारांच्या भेटीला गोंविद बागेतही जाणार असल्याचे समजते. वास्तविक पाहता डॉ. निकम आणि डॉ. काळे हे दोघे जण राज्याच्या कला क्षेत्राला एक नवी दिशाच देणार आहेत. तर दुसर्‍या बाजूने या 19 हजार कलाकारांनी साथ सोडल्यामुळे भविष्यात अजित दादा गटाला मोठा फटकाच सहन करावा लागणार आहे.

Exit mobile version