बीड, दि.13 :- ऊसतोड कामगाराच्या मुलाने फक्त त्याच्या कुटुंबाचे किंवा जिल्हाचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. जे मोठ-मोठ्या कंपन्यांना जमले नाही ते या तरुणाने त्याच्या साथीदारांसह एका पत्र्याच्या शेडमध्ये थाटलेल्या कार्यालयातून करून दाखवले. या तरुणाने ग्राफीक्स बनविण्यासाठीचे डुग्राफिक्स नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले असून ते 15 ऑगस्टपासून देशवासीयांच्या सेवेत रुजू केले जाणार आहे. दादासाहेब भगत असे या सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो आष्टी तालुक्यातील सांगवी पाटणचा रहिवासी आहे.
दादासाहेब भगत याचं कुटुंब हे शेतकरी आणि उसतोड काम करणारं आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना पुणे येथे ऑफिसबॉय म्हणून काम केले. या काळात तो ऍनिमेशनही शिकत होता. कॉलेज संपल्यानंतर त्याला एका ऍनिमेशन कंपनीत नोकरी मिळाली. इथून दादासाहेबाच्या आयुष्याला खरं वळण लागलं. त्याने काम करता करता स्वतःची कंपनी चालू केली. जगभरातील 5945 ग्राहकांना सेवाही पुरवली. नोकरीचा आणि स्वत:च्या कंपनीचा अनुभव मिळाल्यानंतर त्याने स्वत: एक सॉफ्टवेअर विकसित करायचं ठरवलं.
दादासाहेब भगत याने सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी धडपड्या तरुण मित्रांना एकत्र केलं. 3 वर्षांच्या प्रयत्नांनी या सगळ्यांनी मिळून हे सॉफ्टवेअर तयार केलं. हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आलेला खर्च हा या तरुणांनी आतापर्यंत केलेल्या कामातून उभा केला होता. या कामामुळे 20 ते 25 जणांना रोजगार मिळाला आणि येत्या काळात आपण 1000 तरुणांना रोजगार देऊ अशा विश्वास दादासाहेब भगत याने व्यक्त केला आहे. आपण कोरोनामुळे बंद पडलेल्याउद्योगधंद्यांना मार्केटिंग आणि ब्रँडींगसाठी मदत करणार असल्याचे त्याने सांगितले. दै.लोकाशाशी बोलताना सांगितले
पत्र्याच्या शेडमध्ये ऑफिस
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दादासाहेब आणि त्याच्या टीमने त्यांचे कार्यालय पुण्याहून आपल्या मूळ गावी आणले. त्यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे सांगवी पाटण इथे हे कार्यालय एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केले. त्यांची सर्व टीम इथूनच त्यांचे काम करत आहे.