Site icon लोकाशा-बंब न्यूज

राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मगावी उद्या भक्ती आणि शक्तीचा विराट संगम, पंकजाताई मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उसळणार लाखोंचा जनसागर, शिदोरी बांधून, शांततेने, वेळेवर स्वतःची काळजी घेत भगवान भक्तीगडावर या..पंकजाताईंचं कार्यकर्त्यांना आवाहन

बीड । दिनांक २३।
राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगांवी सावरगांव येथे उद्या भक्ती आणि शक्तीचा विराट संगम पहायला मिळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला लाखोंचा जनसागर उसळणार आहे. दरम्यान, दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी शांततेत, वाहने हळू चालवत, घरची भाकरी, चटणी शिदोरी आणि पाण्याची बाटली घेऊन स्वतःची काळजी घेत भगवान भक्तीगडावर वेळेत या, असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

पंकजाताई मुंडे यांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ जारी करून सर्वांना या मेळाव्याला येण्याचे आवाहन करतांना काही सूचना देखील केल्या आहेत. आपल्या कार्यकर्ते व समर्थकांना काळजी घेण्याचे आवाहन करतांना म्हटले आहे, की सावरगावचा दसरा मेळावा ही आपली परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी तुम्ही आणि मी देखील उत्सूक आहे. तुम्ही मोठ्या संख्येने येणार आहात याची मला कल्पना आहे.तुमची मोठी बहिण म्हणून मी तुम्हाला काही सूचना सांगणार आहे. तुम्ही त्या पाळाल याची मला खात्री आहे.
मेळाव्याला येतांना घरून आपली भाकरी, चटणीची शिदोरी सोबत घेऊन या. सोबत पाण्याची बाटली, त्यासोबतच साखर, मीठ मिसळून तयार केलेल्या पाण्याची दुसरी बाटली आणि साखर देखील आपल्या सोबत ठेवा. ऊन प्रचंड असणार आहे, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी गमचा, टोपी, स्कार्फ आणायला विसरू नका.
वाहने वेगाने चालवू नका, शातंतेने या, १० ते ११ वाजे दरम्यान प्रांगणात बसता येईल यादृष्टीने तयारी ठेवा. वाहनांनी येतांना आपली वाहने योग्यरितीने पार्क करा जेणेकरून येणाऱ्या इतर वाहनांची व नागरिकांची गैरसोय होणार नाही. दसरा मेळावा आपल्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करायचा आहेच, पण त्यासोबतच काळजी देखील घ्यायची आहे, असे आवाहन देखील पंकजाताई मुंडे यांनी केले.

Exit mobile version