Site icon लोकाशा-बंब न्यूज

येडेश्वरीकडून शेतकर्‍यांचा दसरा होणार गोड, बीड जिल्ह्यात एफआरपीपेक्षा सर्वाधिक भाव, शंभर रूपयांचा तिसरा हप्ता काढला


केज, दि. 19 (लोकाशा न्यूज) : केज तालुक्यातील आनंदगाव (सा.) येथील येडेश्वरी साखर कारखान्याने सन 2022-23 या गळीत हंगामातील उसाला बीड जिल्ह्यात एफआरपीपेक्षा 150 रुपये जास्तीचा भाव देऊन शेतकर्‍यांचा विजयादशमीचा सण गोड केला आहे.
येडेश्वरी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2022 – 23 मध्ये गाळपास आलेल्या उसाचे बील प्रथम हप्ता 2450 रुपये अदा केले आहे. त्यानंतर द्वितीय हप्ता 100 रुपये अदा केलेला आहे. तर विजयादशमी सणानिमीत्त कारखान्याने 100 रुपये प्रती टनाप्रमाणे तिसरा हप्ता शेतकर्‍यांना दिला आहे. कारखान्याने उसाला  2650 रुपये प्रती टनाप्रमाणे शेतकर्‍यांना उस बील अदा केले आहे. येडेश्वरी साखर कारखान्याने हंगाम 2022-23 मध्ये शासनाने ठरविलेल्या एफआरपी पेक्षा 150 रुपये जास्त भाव दिलेला आहे. तर बीड जिल्ह्यातून येडेश्वरी साखर कारखान्याने उसाला सर्वाधिक उच्चांकी भाव दिलेला आहे. कारखाना हा शेतकर्‍यांसाठी वरदान व शेतकर्‍यांचे हित जोपासणारा कारखाना ठरत आहे. गतवर्षीच्या हंगामात जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी येडेश्वरी साखर कारखान्यास उस गाळपास द्यावा. शेतकर्‍यांना एफआरपीपेक्षा जास्त भाव देऊ अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी दिली होती. तो दिलेला शब्द शेतकरीपुत्र बजरंग सोनवणे यांनी पाळत 150 रुपये जास्तीचा भाव देऊन शेतकर्‍यांचा विजयादशमीचा सण गोड केला आहे. यंदाच्या हंगामात शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन ही चेअरमन बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

Exit mobile version