Site icon लोकाशा-बंब न्यूज

नगर-पाथर्डी महामार्गावर डिझेलचा टँकर पेटला, अंभोरा हद्दीत घडली घटना; सुदैवाने जीवितहानी नाही

कडा

करंजी -नगर-पाथर्डी महामार्गावरील आष्टी तालुक्यातील मराठवाडी टोलनाक्याच्या परिसरात बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास मुंबईकडून बीडकडे जात असलेल्या डिझेल टँकरचे टायर फुटून झालेल्या शाॅर्ट सर्कीटमुळे टँकरला आग लागली. टँकरचालक चहा पिण्यासाठी उतरल्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत जिवितहानी झाली नाही. टँकरच्या आगीमुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली. याबाबत अंभो-याचे सपोनि ढाकणे यांना नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच, त्यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूची वाहतुक थांबविली. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करुन दोन तासानंतर आगीला आटोक्यात आणण्यात यश आले.

अंभोरा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवार दि. १८ रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास (एम.एच.२०-जीसी – ०८९१) असा क्रमांक असलेला टँकर २५ हजार लिटर डिझेल घेवुन मुंबईहुन बीडकडे चालला होता. टँकरचालक संतोष पोपट सोनवणे (रा. खंडाळा ता. वैजापूर जि. संभाजीनगर) हा टँकर थंड होण्यासाठी उभा करुन चहा घेत असतानाच, त्या टँकरचे टायर फुटून शाॅर्ट सर्कीट होऊन डिझेल टँकरने अचानक रस्त्यावरच पेट घेतला. त्यानंतर टँकरच्या केबीनमध्ये झोपलेला सहकारी किरण प्रकाश आहेर यास उठवून चालकाने बाहेर काढले. यावेळी आगीचे मोठ- मोठ लोळ आकाशाला भिडले होते, या आगीमुळे विजेच्या तारा देखील रस्त्यावरच गळुन पडल्या. रस्त्याने जाणा-या टँकरचे टायर फुटुन आग लागली असल्याचे प्रत्यक्ष पहाणार्‍या नागरिकांनी सांगितले. स्थानिक गावक-यांसह अंभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणेंसह पोहेकाॅ बाबासाहेब गर्जे, सफौ शांताराम रोकडे, पोशि शिवदास केदार, सिरसाठ, चालक बाळू जगदाळे या पोलिस कर्मचा-यांनी तातडीने अग्निशामक दलाच्या चार गाड्या बोलवुन घेवुन तब्बल दोन तास आगीशी झुंज देवुन आग आटोक्यात आणली. त्यामुळे जवळपास दोन तास या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सध्या नवरात्र उत्सव असल्याने या रस्त्यावरुन मोहटादेवीच्या दर्शनास पायी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते, या टॅन्करला लागलेल्या आगीमुळे पायी जाणाऱ्या भक्तांसह प्रवाशांचे हाल झाले, सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याचे सपोनि ढाकणे यांनी सांगितले.

Exit mobile version