Site icon लोकाशा-बंब न्यूज

मंगेश लोळगेच्या पोस्टचा व्यापारी महासंघाने केला निषेध, मराठा समाजाविषयी पोस्ट करणारे तुम्ही चोर कोण — व्यापारी महासंघ

बीड : मराठा समाज हा मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने लढा देत असतानाच बीड येथील व्यापारी मंगेश लोळगे याने मराठा समाजाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट केल्यानंतर याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. मराठा समाजाच्या भावनेचा आदर करत मंगेश लोळगे यांच्या पोस्टचा बीड जिल्हा व्यापारी महासंघ कॅटच्या वतीने निषेध करण्यात आला. व्यापारी महासंघाने काढलेल्या पत्रकामध्ये व्यापारी महासंघाच्या वतीने सांगण्यात आलं की, लोळगेने केलेली पोस्ट चुकीची असून जिल्ह्यातील सर्व व्यापार्यांनी कोणत्याच समाजाच्या भावना दुखवतील असे कृत्य करु नये असे आवाहन सुद्धा व्यापारी महासंघाने केले, यासह अशी पोस्ट करणारे तुम्ही चोर कोण असे मत सुद्धा व्यक्त केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व स्तरातून मराठा समाजाला पाठिंबा मिळत आहे. आंतरवाली सराटीला जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी बीड बायपास परिसरात जैन समाज, मुस्लिम समाज यांच्यासह इतर समाजाच्या वतीने नाष्टा, चहापाण्याची सोय करण्यात आली.सर्व समाजाचे मराठा बांधवांनी आभार सुद्धा मानले परंतु दुसरीकडे बीड येथील सुभाष रोड परिसरातील शुभम ज्वेलर्स येथील मंगेश लोळगे यांनी सोशल मीडियावर मराठा समाजाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट केल्यानंतर या पोस्टचा सर्वत्र निषेध करण्यात आला. यात आज (ता. १६) व्यापारी महासंघ कॅटच्या वतीने सुद्धा लोळगे यांच्या पोस्टचा निषेध करत अशी पोस्ट करणारे तुम्ही चोर कोण असा थेट सवालच व्यापारी संघाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. यासह मराठा समाजाच्या सोबत आम्ही असल्याचे मत सुद्धा व्यापारी महासंघ कॅटचे राज्य उपाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष संतोष सोहनी, शहराध्यक्ष विनोद पिंगळे, श्री जितेश पडधरिया, जवाहर कांकरिया, किशोर शर्मा, श्री वर्धमान खिवंसरा, शेख मोहम्मद, श्री ज्ञानदेव डाके, प्रमोद निनाळ, भास्करराव गायकवाड, अंगद नवले यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

व्यापाऱ्यांनी कोणत्याच समाजाच्या भावना दुखू नयेत— व्यापारी महासंघ कॅट

व्यापाऱ्यांसाठी सर्व समाजातील नागरिक हे देवा समान असतात, यामुळे बीड जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाचे मन दुखवेल असे कृत्य करू नये, यासह सोशल मीडियाचा वापर करताना सुद्धा आपण एखाद्या समाजाची भावना दुखवतील असे काही करू नये असे आवाहन व्यापारी महासंघ कॅट च्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व व्यापाऱ्यांना करण्यात आले.

Exit mobile version