Site icon लोकाशा-बंब न्यूज

घर घर केसीसी अभियान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ” ( PM Kisan) योजनेच्या लाभार्थ्यांना पीक कर्ज पुरवठ्यासाठी विशेष मोहीम, “घर घर केसीसी अभियानाचा” शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा – दिपा मुधोळ यांचे आवाहन

केंद्र शासनाने ‘ प्रधान मंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतची मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांना शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळविण्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी तसेच शेतीच्या मशागतीसाठी आवश्यक असणारी पत व्यवस्था सुलभ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची औपचारिक पत व्यवस्थेत नोंदणी करण्यासाठी सरकार आणि वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांसाठी विविध पावले उचलली आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून औपचारिक पतव्यवस्थेच्या बाहेर राहिलेल्या एकूण शेतकऱ्यांसाठी विशेषतः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्त्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाद्वारे ०१.१०.२०२३ ते ३१.१२.२०२३ या कालावधीत “घर घर केसीसी अभियान” राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग, ज़िल्हा परिषदेचे विविध विभाग, बँक, पंचायत समिती, ग्रामपंचायत, बँक प्रतिनिधी, बँक सखी, आर्थिक साक्षरता केंद्रे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून पी एम किसान तसेच शेती, पशुसंवर्धन, दुग्धउत्पादन आणि मत्स्यपालन यातील सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक गावांमध्ये मेळावे घेण्यात येणार असुन लाभार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज बँकेला प्राप्त झाल्यापासून १४ दिवसाच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ दिला जाणार आहे.

तरी या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विशेषतः पी एम किसान च्या लाभार्त्यांना आवाहन आहे कि आपल्या ग्रामपंचायतशी, बँक शाखेशी किंवा नजीकच्या शासकीय विभागाशी संपर्क साधावा आणि “घर घर केसीसी अभियानाचा” शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन दिपा मुधोळ मुंडे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, बँकर्स सल्लागार समिती, बीड यांनी केले आहे.

Exit mobile version