Site icon लोकाशा-बंब न्यूज

मेरी मिट्टी मेरा देश अभियानातून खा.प्रितमताई मुंडे यांनी दिला सामाजिक समरतेचा संदेश, वैद्यनाथ मंदिर,हजरत उमरशाह वली दर्गा आणि सुगंधकुटी बुद्धविहाराची माती केली संकलित

परळी । दि. १७ ।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात राबविण्यात येत असलेल्या मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाचा काल खा. प्रितमताई मुंडे यांनी परळीतून शुभारंभ केला. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या परिसरातली पवित्र माती संकलित केली. तसेच शहरातील सुगंधकुटी बुद्धविहार, हजरत उमरशाह वली दर्गा येथील मातीचे देखील संकलन केले, मंदिर दर्गाह आणि बुद्धविहाराची माती एकत्रित करून शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ संकलित करून त्यांनी सामाजिक समरतेचा विलक्षण संदेश समाजाला दिला.

देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले अशा शूरवीरांच्या सन्मानार्थ राजधानी दिल्लीमध्ये अमृत उद्यान उभारण्याची अभिनव संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला दिली आहे. यानिमित्त संपूर्ण देशातून आलेल्या मातीचा वापर करून अमृत उद्यानात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याअनुषंगाने सुरू खा. प्रितमताई मुंडे यांनी परळीतून माती जमवली. शहरातील प्रभू वैद्यनाथ मंदिर, सुगंधकुटी बुद्धविहार,हजरत उमरशाह वली दर्गा भागातील पावन माती त्यांनी संकलित केली.

याप्रसंगी मंदिर परिसरातील पुजारी,वासुदेव,फुल विक्रेते आणि भाविकांनी अभियानात सहभागी होऊन अमृत उद्यानासाठी खा. प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून कलशात माती संकलीत केली. तसेच दर्गाह आणि बुद्धविहार परिसरातील नागरिकांनी देखील देशाच्या अमर हुतात्म्यांसाठी मातीचे संकलन करून सहभाग नोंदवला. एकाच कलशातील मातीतून मंदिर,दर्गाह आणि बुद्धविहाराला जोडणारी अभिनव संकल्पना या अभियानाच्या माध्यमातून राबवून खा. प्रितमताई मुंडे यांनी सामाजिक समरतेचा विलक्षन संदेश यानिमित्ताने दिला.

Exit mobile version