जाहिर सभेत मांडले मतदार संघातील प्रश्न
बीड, दि.27 (लोकाशा न्युज) ः- हा भाग आपल्या विचारांवर प्रेम करणारा असून आपल्यासोबत उभा राहणार आहे. त्यामुळे या भागातील लोकांच्या प्रेमाची परतफेड विकासाच्या माध्यमातून करण्याचे बळ ना. अजित दादा पवार व ना. धनंजय मुंडे यांनी द्यावे असे मत बीड विधानसभा मतदार संघाचे नेते बळीराम गवते यांनी मांडले. जाहिर सभेत मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. बीड मतदार संघातील प्रश्न मांडताना पुढे श्री. गवते म्हणाले, हा भाग आणि हा मतदारसंघ कायम आपल्या विचारांवर प्रेम करणारा राहिला आहे. आपल्या शब्दावर आतापर्यंत मतदारांनी कौल दिला पण तरीही मागच्या काही वर्षात मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. तो अनुशेष भरून काढण्यासाठी आता काम करावे लागणार आहे. बीड मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. बीड शहरातील बिंदुसरा पुल कम बंधारा हा महत्वाचा आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न आहेत, महावितरणला आपण ट्रान्सफॉर्मर वेळेत देण्याबाबत सांगावे. कृषी आधारित प्रक्रिया उद्योग, एमआयडीसीला गती देणे हे विषय महत्वाचे आहेत. मागच्या काळात प्रशासनावर दबाव, धाक, दहशतीचे राजकारण झाले, त्यामुळे आज मतदारसंघात यायला अधिकारी तयार नाहीत, कर्मचारी अस्वस्थ आहेत. विकास कामांऐवजी केवळ याची तक्रार त्याची तक्रार यातच काहींनी समाधान मानले. त्या पद्धतीला आता पूर्णविराम द्यायचा आहे. कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकार्यांमध्ये जे भीती दाखविण्याचे काम झाले, आता सत्ता आपल्यासोबत आहे हा विश्वास कार्यकर्त्यांना द्यावा लागेल. हा विश्वास आज दादांनी आम्हाला द्यावा, कार्यकर्त्यांना द्यावा असे ते म्हणाले.
ना. दादा, ना. मुंंडेंनी विकासाच्या माध्यमातून बळ द्यावे-बळीराम गवते
