
बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यात अवैधरित्या वृक्षतोड होत असताना याला लगाम घालण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी अमोल काकडे यांनी कंबर कसली असून कट साईज लाकडाने भरलेला ट्रक औरंगाबादहून बेंगलोरकडे जात असताना तर दुसरा वांगी शिवारातून अवैधरित्या वृक्षतोड करून बीडच्या दिशेने निघालेला टेम्पो वनविभागच्या अधिकार्यांनी पकडला. यावेळी लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही आजपर्यंतची वन विभागाची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून वृक्षप्रेमी कडून वन विभागच्या अधिकार्यांचे कौतूक आणि अभिनंदन केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादहून कट साईज लाकडाने भरलेला एक ट्रक विना परवाना बीडमधून शुक्रवारी दि. 11 ऑगस्ट रोजी जात असल्याची माहिती येथील वन विभागच्या अधिकार्यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली त्यानुसार पाली शिवारात वरिष्ठ वन अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे वनपाल डी.एस. गाडेकर यांनी आपल्या सहकार्यांसमवेत सापळा रचला असता मांजरसुंब्याच्या दिशेने रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ट्रक क्रमांक (एम.एच. 23 एव्ही 5394) येत असल्याचे आढळून आले. यावेळी मोठ्या शिताफीने ट्रक थांबवून त्याची झाडाझडती घेतली असता त्यात कट साईजने भरलेले लाकूड अढळून आले. यावेळी 1470 घनफुट कट साईज केलेले लाकूड असा एकूण 30 ते 35 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी वाहनचालक मालक शेख खय्यूूम शेख उस्मान याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय वन अधिकारी श्री. गर्कल, वन परिक्षेत्र अधिकारी अमोल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी.एस. गाडेकर, श्रीमती एम.व्ही. काळकुटे, वन मजूर बंडू गिरी यांनी केली तर दुसरी कारवाई बीड तालुक्यातील वांगी फाट्या नजीक अवैधरित्या वृक्षतोड करून बीडच्या दिशेने टेम्पो क्रमांक (एम.एच. 06 जी.4846) येत असताना वन विभागाच्या कर्मचार्यांनी शनिवारी पकडला. यावेळी दोन ते अडीच घनमीटर लाकूडाने भरलेला टेम्पो असा एकूण सुमारे लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई विभागीय वन अधिकारी श्री.गर्कल, वन परिक्षेत्र अधिकारी अमोल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्री.बहिरवाळ, वनरक्षक श्री.तोंडे यांनी केली. याप्रकरणी आरोपी शेख मुजीब शेख जान मोहम्मद यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी अमोल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी करत आहेत.
काकडेंनी वनविभागाचा कारभार सुधारला
दरम्यान बीड तालुका वन परिक्षेत्र अधिकारी अमोल काकडे हे आल्यानंतर मागील काही वर्षानंतर बीड तालुक्यातील सर्वात मोठी ही कारवाई मानली जात आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना कायम वृक्ष प्रेमीकडून वन विभागाचे अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न निर्माण केला जात असताना अमोल काकडे यांच्या टीमने केलेली या कारवाईचे सर्वत्र कौतूक होत आहे.
