Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड बीईओंचा पदभार घेण्यास दोघांचा नकार, आता प्रणिता गंगाखेडकर, तुकाराम पवार,समंदर खान यांच्या नावांची चर्चा


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : बीड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या बीईओ पदी आता कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे, मात्र या पदावर काम करण्यास दोन विस्तार अधिकार्‍यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे आता बीईओ म्हणून प्रणिता गंगाखेडकर, तुकाराम पवार आणि समंदर खान यांच्या नावांची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.
बीड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी म्हणून श्रीराम टेकाळे यांनी पदभार घेतल्यानंतर गतीने काम केले. त्यांनी तालुक्यातील झेडपीच्या शाळेत राबविलेला उजळणी पॅटर्न संपुर्ण महाराष्ट्रात गाजला. तब्बल एक लाख 40 हजार विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी हा उजळणी पॅटर्न पोहचविण्याचे काम खर्‍या अर्थाने केले, त्यामुळेच त्यांच्या कामावर राजकिय नेत्यांसह बीड झेडपीचे तात्कालिन सीईओ अजित पवार हे जाम खुश होते, नुकतेच टेकाळे हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी आता कोणाला नियुक्ती द्यायची हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण सिनॅरिटीनुसार विस्तार अधिकारी मधुकर तोडकर बीईओ म्हणून काम पाहू शकतात, मात्र त्यांनी आणि विस्तार अधिकारी तुकाराम जाधव यांनी बीईओंचा पदभार स्विकारण्यास स्पष्टपणे नकारच दिला आहे. त्यामुळे आता बीईओ पदासाठी प्रणिता गंगाखेडकर, तुकाराम पवार आणि समंदर खान यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. वास्तविक पाहता प्रणिता गंगाखेडकर यांचे काम मोठे आहे, त्यांच्यामुळे बीड तालुक्यातील झेडपींच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढू शकते, तसेच तुकाराम पवार हेही कामात कुठेच मागे नाहीत, त्यांच्यामुळे झेडपीला मोठा फायदाच होवू शकतो. समंदर खान यांच्यासाठी काही पुढारी वसीला लावून बसलेले आहेत. त्यामुळे त्यांचा वसीला कितपत चालतो हेच पाहणे औचित्याचे ठरणार आहे. दरम्यान येत्या दोन तीन दिवसात बीड पंचायत समितीला नवा बीईओ मिळेल असा विश्‍वास शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी बोलून दाखविला आहे.

Exit mobile version