Site icon लोकाशा-बंब न्यूज

कायदा हातात घेणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांचा इशारा

केज – कुठे ही काही चुकीचे घडत असेल तर पोलीसांना वेळीच माहिती द्या, कोणी ही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्या लोकांची गय न करता प्रशासन कडक कारवाई करेल, असा इशारा अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिला.

   तालुक्यातील आडस येथे शनिवारी घडलेल्या अनुचित घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी १०.३० वाजता शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर बोलत होत्या. बैठकीला भाजपाचे नेते रमेशराव आडसकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, धारुर पोलीस ठाण्याचे प्रमुख सपोनि विजय आटोळे, युवा नेते ऋषिकेश आडसकर, चेअरमन उद्धवराव इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

   पुढे बोलताना कविता नेरकर म्हणाल्या की, दोन वर्षे झाले मी जिल्ह्यात काम करते. पण आडस गावाच्या बाबतीत कधीच काही चुकीचे ऐकण्यात आले नाही. शनिवारी फोन आला आणि मला विश्वास बसला नाही. मात्र हा प्रकार सोशल मीडियामुळे झाल्याचे स्पष्ट आहे. यामुळे पालकांनी आपली मुले काय करतात. कोणाच्या संगतीत आहेत हे पहाणे गरजेचे आहे. आपल्या तरुणांमध्ये खूप उर्जा आहे. परंतु ती चुकीच्या मार्गावर खर्च होत असून, प्रशासनात अधिकारी, कर्मचारी होण्यासाठी उर्जा खर्च करुन सत्कारासाठी बोलवा असे आवाहन केले.

यावेळी रमेशराव आडसकर म्हणाले की, हे आपलं गाव एक कुटुंब आहे. येथे असे प्रकार घडत नाहीत. परंतु काही जणांमुळे हे घडलं. पण यापुढे हे सहन करणार नाही. कोणी चुक केली तर त्याला शंभर टक्के शिक्षा मिळणार. गाव प्रगतीपथावर असून आणखी विकासात पुढं जायचं असेल तर शांततेची गरज आहे. यामुळे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करू नये. काहीही चुकीचे घडत असेल तर पोलीस प्रशासनाकडे तक्रार करा. असे आवाहन त्यांनी केले. तर एएसपी पंकज कुमावत यांनीही मार्गदर्शन केले. 

यावेळी दोन्ही समाजातील प्रतिनिधींनी यापुढे असा प्रकार घडणार नाही अशी ग्वाही दिली. प्रस्ताविक सपोनि विजय आटोळे यांनी केले. आभार रामदास साबळे यांनी मानले. यावेळी गावातील ग्रामस्थ, तरुण मोठ्या उपस्थिती होती.
Exit mobile version