Site icon लोकाशा-बंब न्यूज

जलक्रांतीच्या नायकाची बदली, सीईओ अजित पवारांचे जल धनुष्य अविनाश पाठकांच्या हाती, पवार साहेब तुमको ना भुल पायेंगे”


बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : अजित पवार या नावातच दरार आणि रूबाब आहे, अगदी या रूबाबदार नावाप्रमाणेच सीईओ अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात कारकिर्द गाजवली, एक कर्तव्यदक्ष अधिकारी काय करू शकतो हे त्यांनी आपल्या कामातून सर्वांना दाखवून दिले. त्यांना जिल्ह्यातील 1267 गावात जलजीवन मिशनमधून पाणी पोहचविण्यास खर्‍या अर्थाने यश आले, विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील तब्बल 22 हजार विहीरींच्या माध्यमातून त्यांनी शेतकर्‍यांना खंबीरपणे साथ दिली, ज्यांनी घोटाळे केले त्यांच्या भोवती कारवाईचा फास आवळण्याचे काम त्यांनी खर्‍या अर्थाने केले. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील पाच पुरस्कारही त्यांनी बीड झेडपीला मिळवून दिले. त्यामुळे त्यांच्या कामावर जिल्ह्यातला प्रत्येक माणूस खुश होता. प्रत्येक कामात कर्तव्यदक्ष असणारे अजित पवार यांच्या जागी आता आयएएस अविनाश पाठक यांची बदली करण्यात आली आहे. पवारांनी जिल्ह्यात सुरू केलेली कामे तेवढ्याच गतीने सुरू ठेवण्याचे काम आता अविनाश पाठक यांना करावे लागणार आहे.
मागास जिल्हा म्हणून बीडकडे पाहिले जाते, सहसा या जिल्ह्यात अधिकारी येत नाहीत, मात्र याला अपवाद सीईओ अजित पवार ठरले आहेत. त्यांनी आपल्या सीईओ पदासाठी बीड मागितले आणि त्यांना ते मिळालेही. रूजू झाल्यापासून ते आतापर्यंत त्यांनी बीड जिल्ह्याला पुढे घेवून जाण्यासाठीच काम केले, आलेली प्रत्येक फाईल अवघ्या काही सेंकदात मार्गी लावणारे ते अधिकारी ठरले, जिल्ह्यातील प्रत्येक कामाला गती देण्याचे काम त्यांनी केले, ते रूजू झाल्यापासून बीड जिल्ह्यात जवळपास 22 हजार वैयक्तिक विहीरींचे कामे सुरू आहेत. यामुळे शेतकर्‍यांना हक्काची विहीर मिळालेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जलजीवन मिशन या योजनेला त्यांनी जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात गती दिली, यामुळे जिल्ह्यातील 1267 गावांना पाणी मिळणार आहे, त्यांनी गतीने राबविलेल्या याच योजनेमुळे या वर्षी बीड जिल्ह्यात एकही टँकर लागलेला नाही, पाणंद रस्ते, घरकुल यासह प्रत्येक योजना त्यांनी गतीने राबविली, त्यांच्या टेबलवर एकही फाईल कधी पडून राहत नव्हती, आलेल्या फाईंलींचा त्यांनी तात्काळ निपटारा केला, यामुळे बीड जिल्ह्यातील अनेकांचे प्रश्‍न खर्‍या अर्थाने मार्गी लागले, सुसज्ज अशी रेकॉर्ड रूम तयार करून एका सेकंदामध्ये फाईल उपलब्ध करून देण्याची सोय त्यांनी सर्वांना करून दिली, जिल्ह्याच्या आणि जनविकासाचे काम करताना ज्या ज्यावेळी घोटाळे समोर आले त्या त्यावेळी त्या घोटाळेबाजांच्या भोवती कारवाईचा फास आवळून त्यांना अद्दल घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. बोगस अपंग दाखवून शासनाची फसवणूक करणार्‍या शिक्षकांवर त्यांनी कारवाईचा आसूड उगारला, यामुळे शिक्षकांचा बुरखा टराटरा फाटला आणि त्यांचे खरे रूप सर्वांसमोर आले. कार्यालयीन काम उरकून त्यांनी फिल्डवर जावूनही प्रत्यक्ष काम केले, प्रश्‍न घेवून आलेल्या प्रत्येक नागरिकांना त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, कर्मचारी असो की अधिकारी त्यांच्यासोबतही अजित पवार नेहमीच चांगलेच वागले. त्यांच्या प्रभावी कामामुळेच बीड झेडपीला पाच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारही मिळाले. असे असतानाही केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी जिल्ह्यातील काही जण त्यांना बदनाम करत होते, मात्र याचा थोडाही विचार न करता त्यांनी आपले काम सुरूच ठेवले, वास्तविक पाहता अजित पवारांसारखा कर्तव्यदक्ष अधिकारी मिळायलाही नशीबच लागते, आणि बीड जिल्ह्याचे नशीब होते म्हणून ते मिळाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बीड जिल्ह्यासाठी मोठे योगदानच दिलेले आहे आणि ते जिल्हा कधीच विसरू शकत नाही, डिसेंबर एण्डला ते शासकिय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत, यापुर्वी शासनाने अशा कर्तव्य दक्ष अधिकार्‍याची बीडमधून बदली करून बीडचे मोठे नुकसानच केले आहे, त्यांच्या जागी सीईओ म्हणून सध्या छत्रपती संभाजी नगर येथे कर्तव्य बजावणारे अविनाश पाठक यांची बदली झाली आहे. पाठक यांनी यापुर्वी बीड जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि डीसीसी बँकेचे प्रशासक म्हणून काम केलेले आहे, ते एक कर्तव्यदक्ष अधिकारीच आहेत. त्यामुळे त्यांचाही कार्यकाळ बीड जिल्ह्यासाठी चांगलाच जाईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

कोणाकडूनही एकही रूपया घेतला नाही
बीड जिल्ह्यात असे अनेक जण आहेत जे की पैसे देवून स्वत:चे कामे करून घेतात आणि अधिकारीही बिनधास्तपणे अशा कामांसाठी पैसे घेतात, अजित पवार मात्र याला अपवाद आहेत, त्यांनी आपल्या कार्यकाळात बीड जिल्ह्यात कोणाकडूनही एकही रूपया घेतला नाही. त्यामुळेच त्यांच्या बाबत बीड जिल्ह्यातील प्रत्येकाला आदर आहे.

सरपंचांना उभा करून
गावे केली आदर्श
सीईओ अजित पवारांनी सरपंचांना उभा करून जिल्ह्यातील अनेक गावे आदर्श केली, यामध्ये आवरगाव, मस्साजोग यासह अन्य गावांचा समावेश आहे, याचा वर्षानुवर्षे बीड जिल्ह्याला मोठा फायदाच होणार आहे.

शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले
सीईओ अजित पवार हे शेतकर्‍यांना ताकत देणारे आहेत, बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांनी मोठी साथ दिली, विहीरींबरोबरच त्यांनी तुती लागवडीमध्येही शेतकर्‍यांना प्रोत्साहित करून त्यांच्या उत्पादनात मोठी भर घालण्याचे काम केले. त्यांच्याच नेतृत्वात गेवराईतील रूई हे गाव तुतीत उंच भरारी घेत आहे.

अविनाश पाठक सोमवारी
रूजू होणार

सीईओ अजित पवार यांच्या जागी आयएएस अविनाश पाठक यांची बदली करण्यात आली आहे, त्यानुसार अविनाश पाठक हे सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारणार आहेत.

Exit mobile version