Site icon लोकाशा-बंब न्यूज

वाचाळवीर मनोहर भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी – ॲड. सुभाष राऊत,समता परिषदेच्यावतीने मनोहर भिडेचा प्रतिकात्मक पुतळा जाळून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

.


बीड / प्रतिनिधी
वाचाळवीर मनोहर भिडे याचे मानसिक संतुलन बिघडल्याप्रमाणे वागत असून महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करीत आहे. मनोहर भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात त्यास डांबून टाकावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांनी केली असून यासंदर्भात जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समता परिषदेच्या वतीने निवेदन सादर केले आहे. मनोहर भिडे याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर राज्यभर समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी ॲड. सुभाष राऊत यांनी दिला आहे.
मनोहर भिडे याने मागील काही दिवसापूर्वी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अवामानकारक वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बद्दल देखील अपमान कारक वक्तव्य केले आहे. मनोहर भिडे याच्याकडून नेहमीच महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करण्यात येऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मनोहर भिडे याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा त्याला येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात डांबून टाकावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बीडचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदन देताना समता परिषदेचे बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे, माळी महासंघाचे विश्वस्त प्रा. लक्ष्मण गुंजाळ, नितीन राऊत, माळी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष धनंजय काळे, सावता काळे, देविदास गुंजाळ, मनोज भानुसे, राहुल गवळी, अजय काळे यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, फुले प्रेमी नागरिक आदींची उपस्थिती होती.

चौकट
प्रतिकात्मक पुतळा जाळून केला निषेध
निवेदन देण्यापूर्वी क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ वाचाळवीर मनोहर भिडे याच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपला बुटांचा चोप देऊन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जाळण्यात आला. यावेळी मनोहर भिडे याच्या निषेधार्थ घोषणा देऊन मनोहर भिडे याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

Exit mobile version