गेवराई- जबरी चोरी, वाळू गौण खनिज चोरी, जीवे मारण्याच्या धमक्या अश्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गोरख सदाशिव काळे व लखन तुकाराम काळे या दोन वाळू माफिया गुंडावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करत त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. गेवराई तालुक्यात गोरख काळे आणि लखन काळे या दोघांनी प्रचंड धुमाकूळ घातला होता. गोरखविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल आहेत.यामध्ये अनेक गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून 6 गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. तर दोन गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. तसेच लखन काळे याच्यावरही वाळू गौण खनिज चोरी, रस्ता अडविणे, चढ्या भावाने वाळूची विक्री करणे असे गंभीर स्वरूपाचे 5 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान या दोघांवर मपोकाअंतर्गत दोन वेळा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु या दोघांनी ही कायदाला पायमली तुडवत गेवराईत दहशत निर्माण केल्याने या दोघावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गेवराईतील दोन वाळू माफियांची हर्सूल कारागृहात रवानगी, एलसीबीची मोठी कारवाई
