Site icon लोकाशा-बंब न्यूज

28 जुलैला शेतकर्‍यांच्या खात्यात येणार पीएम किसानचा चौदावा हप्ता, नरेंद्र मोदींच्या हस्ते 18 हजार कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात टाकले जाणार दोन हजार रूपये


दिल्ली, दि. 17 (लोकाशा न्यूज) : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने या योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. शेतकर्‍यांना 14 व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार आहे. सरकारने या संदर्भात तारीख जाहीर केली आहे. मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे शेतकर्‍यांना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये, असे वर्षातून सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत दोन हजार रुपयांचे 13 हप्ते पूर्ण झाले आहेत. 13 वा हप्ता 27 फेब्रुवारीला देण्यात आला होता आणि शेतकरी आता 14 व्या हप्त्याची वाट पाहत होते.  सरकारने केलेल्या घोषणेनुसार येत्या 28 जुलैला शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार आहे. या दिवशी देशातील जवळपास नऊ कोटी शेतकर्‍यांना 14 वा हप्ता दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे 18 हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थान येथील नागौर जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता ट्रान्सफर करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजेरी लावणार आहेत आणि स्वत: बटण दाबून शेतकर्‍यांच्या ऑनलाईन खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहेत.

Exit mobile version