नवी दिल्ली, 11 जुलै : विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ठाकरे सरकारने 12 आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली होती. मात्र त्यावर निर्णय देण्यात आला नव्हता.
याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे तूर्तास नियुक्ती वरची स्थगिती हटली आहे. मध्यस्थ याचिकाकर्ते सुनील मोदी यांना नवी याचिका करायला कोर्टाने सांगितलं आहे. सुनील मोदी लवकरच नवी याचिका दाखल करणार आहेत.
ठाकरे सरकारने दिलेल्या आमदारांच्या यादीवर काही निर्णय राज्यपालांकडून घेण्यात आला नव्हता. दरम्यान, नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने नवी यादी दिली. याविरुद्ध सुनिल मोदी यांनी याचिका दाखल करून ठाकरे सरकारने दिलेली यादी कायम ठेवावी अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२२ पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती.