Site icon लोकाशा-बंब न्यूज

गुत्तेदाराच्या हत्येप्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल, डोक्यात अँगलचे घाव घालून केली हत्या; मारेकरी गुत्तेदाराची गाडी घेऊन फरार

परळी वैजनाथ दि १ (लोकाशा न्युज) :- परळी शहर पोलीस ठाणे हद्दीतील बायपास कॉर्नरला जिरेवाडी शिवारात गुत्तेदार आत्माराम उर्फ बंडू निव्रती मुंडे राहणार कन्हेरवाडी‌ यांची डोक्यात अँगलचे घाव घालून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी चंद्रकांत गोसावी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मयत मुंडे यांच्या वॉचमन सह दोघांवर परळी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी मयताची इनोव्हा कार घेऊन पोबारा केला आहे पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी तालुक्यातील कन्हेरवाडी गावचे रहिवासी असलेले अत्यंत मनमिळावू सोज्वळ स्वभावाचे आत्माराम मुंडे हे गुत्तेदार असून शेतकरीही होते. प्राप्त माहितीनुसार आत्माराम मुंडे हे काल रात्रीपासूनच घरून निघून गेले होते मात्र ते परत आलेच नव्हते. आत्माराम उर्फ बंडू मुंडे यांच्या परिवाराने त्यांचा शोध घेतला असता कोणत्याच प्रकारचा सुगावा त्यांना लागत नव्हता. मात्र आज आत्माराम मुंडे यांचे बायपास कॉर्नरला जिरेवाडी शिवारात शेत असून त्या ठिकाणी शोधाशोध केली असता पत्र्याचे शेड मध्ये त्याच ठिकाणी ते मरणासन्न अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यात अँगलचे घाव घालून त्यांची हत्या केली असल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट झाले. घटनास्थळावर रक्ताने माखलेले लोखंडी अँगल देखील मिळून आले. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी कन्हेरवाडी गावासह परळी शहरात पसरली. सदर घटनेची माहिती परळी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर व पोलीस उपाधीक्षक चोरमले यांना देऊन ते आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, गोविंद कांदे गोविंद एलमाटे विष्णू फड पंडित पांचाळ यांच्यासह त्वरित दाखल झाले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान झाल्या घटनेची मयत आत्माराम उर्फ बंडू निव्रती मुंडे यांचा भाऊ शिवाजी निवृत्ती मुंडे राहणार कनेरवाडी तालुका परळी यांच्या फिर्यादीनुसार संशयित मयत मुंडे यांचा वाचमन महेश नामदेव रोडे व दुसरा आरोपी पवन भीमराव रोडे दोघेही राहणार कन्हेरवाडी तालुका परळी यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गु र् नंबर १२८/२०२३ कलम ३०२, ३४ भादवी नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी मयत आत्माराम उर्फ बंडू मुंडे यांची इनोव्हा कार क्रमांक एम एच ४५/ झेड‌ ०१११ सह फरार झाले आहेत. संशयित आरोपींनी गुत्तेदार आत्माराम मुंडे यांची हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास ठाण्याचे प्रभारी चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ हे करीत आहेत.

Exit mobile version