बीड दि.३० (प्रतिनिधी):- आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे व डॉ.बाबु जोगदंड यांच्या प्रयत्नामुळे चौसाळा सर्कलमधील चांदणी व पालसिंघण या गावातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उर्वरित अनुदान रक्कम वितरीत करण्याचे आदेश महसूल मंत्रालयाने दिले आहेत.
बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या चांदणी व पालसिंघण या गावातील शेतकऱ्यांना, २०२२ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून देण्यात आली होती. परंतु जास्त क्षेत्र बाधित असून कमी अनुदान देण्यात आले असल्याचे अनेक प्रकरणे समोर आले होते. यावर डॉ.बाबु जोगदंड यांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे पाठपुरावा केला व आ.संदीप क्षीरसागर यांनी शासन, प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती केली. त्यानुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ज्या शेतकर्यांच्या नमुना ८-अ प्रमाणे जास्त क्षेत्र बाधित असून कमी अनुदान वितरित झाले आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या नमुना ८-अ प्रमाणे बाधित क्षेत्रानुसार अनुदान याद्या दुरूस्त करून पूर्वी दिलेली अनुदान रक्कम वजा करून उर्वरित अनुदान रक्कम वितरीत करण्यात यावी. असे आदेश शुक्रवार (दि.३०) रोजी महसूल मंत्रालयाने जिल्हाधिकारी, बीड यांना दिले आहेत. आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे डॉ.बाबु जोगदंड व ग्रामस्थांनी आ.संदीप क्षीरसागर यांचे आभार मानले आहेत.
आ. संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना न्याय, चौसाळा सर्कलमधील शेतकर्यांना नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम देण्याचे आदेश
