औरंगाबाद – मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या घटनेतील तरतुदीनुसार कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या निवडीसाठी 2 जुलै 2023 रोजी निवडणूक होत आहे. सदरील निवडणूकीस स्थगिती द्यावी यासाठी मशिप्र मंडळाचे सदस्य मानसिंग पवार, चंद्रशेखर राजूरकर व इतरांनी मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दोन रिट याचिकेव्दारे आव्हान दिले होते. मात्र बुधवारी (दि.21) सदरील रिट याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या असून 2 जुलै 2023 रोजी होणार्या मशिप्र मंडळाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा 2 जुलै 2023 रोजी औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या रविंद्रनाथ टागोर सभागृहात मशिप्र मंडळाच्या घटनेत नमूद कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य (अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, सरचिटणीस, दोन सहचिटणीस, कोषाध्यक्ष व कार्यकारी मंडळाचे चौदा सदस्य) यांच्या निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
मात्र या निवडणूकीस स्थगिती द्यावी यासाठी मशिप्र मंडळाचे सदस्य मानसिंग पवार, चंद्रशेखर राजूरकर व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन रिट याचिकेव्दारे आव्हान दिले होते. सदरील याचिका मा.न्यायमूर्ती मंगेश पाटील व मा.न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या खंडपीठासमोर 21 जून रोजी सुनावणीस आली असता दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. युक्तीवादानंतर मा.उच्च न्यायालयाने मानसिंग पवार, चंद्रशेखर राजुरकर व इतरांनी दाखल केलेल्या रिट याचिका गुणवत्तेच्या आधारावर फेटाळत मशिप्र मंडळाच्या 2 जुलै 2023 रोजी होणार्या निवडणूकीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक 2 जुलै रोजी ठरलेल्या ठिकाणी व ठरलेल्या वेळेत होणार आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या घटनेतील तरतुदीनुसार 10 जुलै 2023 ते 9 जुलै 2028 या कालावधीकरीता ही निवडणूक होत आहे.
