Site icon लोकाशा-बंब न्यूज

भारताने नऊ वर्षात गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या, पूर्वी भारताचा आवाज ऐकू येत नव्हता, आता संपूर्ण जगात भारताचा डंका – पंकजाताई मुंडे

जबलपूर (म.प्र.) ।दिनांक १३।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी गेल्या चार दिवसांत संघटनात्मक दृष्टया मध्यप्रदेशचा यशस्वी झंझावाती दौरा केला. मोदी @9 अभियानांतर्गत त्यांचे विविध जिल्हयात मोठया उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणात कार्यक्रम पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात भारताने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या आहेत. पूर्वी भारताचा आवाज ऐकू येत नव्हता, आता भारताचा डंका जगात वाजत असल्याचे त्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रमात बोलतांना सांगितले.

गेल्या नऊ वर्षांत गरीब आणि वंचितांची सेवा करणारा, महिला शक्तीला बळ देणारा, तरुणांची स्वप्ने पूर्ण करणारा आणि शेतकऱ्यांचे कल्याण करणारा भारत निर्माण झाला आहे. कलम ३७० रद्द करण्यात आले, तिहेरी तलाकची वाईट प्रथा संपली आणि दहशतवाद संपुष्टात आला. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथे भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराचे बांधकामही वेगाने सुरू आहे. इंडिया गेट पूर्णपणे बदलले आहे असे पंकजाताई म्हणाल्या.
पुढे पत्रकारांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, गेल्या ९ वर्षात देशात सुमारे ४८ कोटी जनधन खाती उघडण्यात आली.प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत २ लाख १५ हजार २७२ हून अधिक लोकांना कर्ज मिळाले आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत ९.५ कोटी १ लाख ८७ हजार ६२४ गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले, याशिवाय इतर अनेक योजना सुरू करण्यात आल्या. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाने ३० मे ते ३० जून या कालावधीत विशेष जनसंपर्क अभियान सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.

दौऱ्यात येथे झाले कार्यक्रम

पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत या अभियानांतर्गत जबलपूरसह शहडोल, बालासोर, मंडला, कटंगी, सिंधूभवन, बालाघाट, उमरिया आदी ठिकाणी कार्यकर्ता मेळावा, पत्रकार परिषदा, जाहीर सभा, जिल्हास्तरीय मेळावा, व्यापारी संमेलन, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी आदी कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले. जबलपूर येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री लाडली बहना योजनेतील लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप पंकजाताईंच्या उपस्थितीत केले.
माजी मंत्री ज्ञानसिंगजी, खासदार भोलासिंह, आ. शिवनारायण सिंह, आ. अजय बिश्नोई, आशिष दुबे, राकेश सिंह आदी या दौऱ्यात उपस्थित होते.
•••••

Exit mobile version