बीड:- बीड जिल्ह्यातील उसतोड कामगार महीलांना आता उसतोडीला जाण्याची गरज नाही. शासनाच्या वतीने रोजगार हमी योजनेतून स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळवून दीला जाईल अशी ग्वाही बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली. महीला उसतोड कामगार संघटनेच्या वतीने वडवणी येथे आयोजित उसतोड कामगार संघटनेच्या मेळाव्यात महीलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
महीला उसतोड कामगार संघटनेच्या नेत्या मनिषा तोकले यांच्या नियोजन आतून वडवणी येथील महादेव मंदीराच्या सभागृहात झालेल्या महीला उसतोड कामगार संघटनेच्या मेळाव्यात उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात दत्ता डाके, जिवन राठोड, तहसीलदार संभाजी मंदे, नायब तहसिलदार प्रकाश सिरसेवाड, यांनीही या महीला मेळाव्यास मार्गदर्शन केले. पुढे बोलताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या की, या जिल्ह्यातील महीलांनी आता उसतोडीला जावू नये. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मी त्या महीलांना इथेच रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. मनिषा तोकले यांनी आता पर्यंत सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. आता त्यांनी महीला उसतोड कामगार संघटनेच्या माध्यमातून महीलांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करत आहेत. या पुढे महीलांनी उसतोडीला जाण्या ऐवजी रोजगार हमी योजनेच्या कामाचा लाभ घेतला पाहिजे. ज्या उसतोड मजूरांकडे शेती आहे. त्यांनी रेशिम शेती केली पाहीजे. रोजगार हमी योजने अंतर्गत शासन रेशिम शेतीला शासन मदत करत आहे.
महीला उसतोड कामगार संघटनेच्या नेत्या उसतोड कामगार महीलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, महाराष्ट्रातील उसतोड कामगार महिला जोपर्यंत संघटीत होत नाहीत. आणि रस्त्यावर उतरून प्रश्न मांडत नाहीत. तो पर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व उसतोड कामगार महीलांनी एकत्र आले पाहिजे आणि आपले हक्क मिळवून घेण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच आपले न्याय हक्क आपणाला मिळतील. म्हणूनच उसतोड कामगार महीलांनी संघटीत झाले पाहीजे असे आवाहन मनिषा तोकले यांनी केले,
या महीला मेळाव्यात शासनाच्या वतीने उसतोड कामगार ओळखपत्र व रेशनकार्ड वाटप करण्यात आले. तसेच उसतोडणी सोडून स्वतः चा व्यवसाय करणार्या महीलांचा सत्कार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
याच कार्यक्रमात सोफेकाॅमच्या पल्लवी हर्षे, उसतोड कामगार संघटनेच्या वडवणी तालुक्यातील क्राती खळगे, धारूर तालूका प्रमुख रुपाली डोंगरे सह दीपा वाघमारे, जोती थोरात, आम्रपाली डोंगरे, लक्ष्मी पाटोळे, छाया ताई पडघम, तत्वशील कांबळे, यांनीही महीलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, प्रदीप डोंगरे, हेमंत पायाळ, रवि थोरात, साधना सावंत, प्रणाली कोरडे, मानसी शिंदे, आरती बनकर, प्रेमानंद मोरे, मिथून जोगदंड, कामिनी पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट:- उसतोडणीला जायचे आहे म्हणून मुलीचे कमी वयात लग्न करू नका. बालविवाह केल्यास शासनाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे उसतोडीचे कारण देवून कुठल्याही पालकांनी बालविवाह करू नये. असे आवाहन दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.