Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्याची पाच लाखांची बॅग लांबवली ;स्कुटी वरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी केला प्रताप, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परळी वैजनाथ दि ७ (लोकाशा न्युज) :-

परळी शहरातील बस स्थानक ते शिवाजी चौक राज्य रस्त्यावर डॉक्टर कराड यांच्या दवाखान्यासमोर काल चित्रपटातून शोभेल असा प्रकार घडला. व्यापार्याच्या व्यवसायाची उधारी वसुली करून रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या नौकराच्या हातातील बॅग पाठीमागून स्कुटीवर आलेल्या अज्ञात तीन चोरट्यांनी झटका मारीत हिसकावली व क्षणार्धात पोबारा केल्याची घटना घडली आहे. या बॅगमध्ये ४ लाख ९० हजाराची रक्कम होती. विशेष म्हणजे हा रस्ता राज्य रस्ता असल्याने नेहमीच वर्दळ असते तशा रस्त्यावर अशी रॉबरी झाल्यामुळे व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान याप्रकरणी सर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल रात्री नऊ ते साडेनऊ दरम्यान परळी अंबाजोगाई राज्य रस्ता म्हणजेच बस स्टँड ते शिवाजी चौक दरम्यान डॉक्टर कराड हॉस्पिटल समोरच परळी बाजारपेठेतील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडे नोकर म्हणून कामाला असलेल्या रमेश ज्ञानोबा पाचणकर वय ५८ राहणार कडबा मार्केट परळी वैजनाथ येथील असून ते एका व्यापाऱ्याच्या दुकानी वसुलीचे काम करतात. काल रात्री वसुली करून रोख रक्कम ४ लाख ९० हजार असलेली बॅग हातात घेऊन पायी चालत होते. इतक्यात पाठीमागून तिघे चोरटे स्कुटी गाडीवरून येत पाचनकर यांच्या हाताला झटका मारीत रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेत पोबारा केला. हा प्रकार घडताच पाचनकर यांना काही काळ कांहीच समजेनासे झाले.
तदनंतर रमेश पाचनकर यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले आणि झाला प्रकार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना सांगितला. गोसावी यांनी क्षणाचाही विलंब न करता झाला प्रकार समजून घेतला व रमेश ज्ञानोबा पाचणकर यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात आज दिनांक ७/०६/२०२३ गु र् नंबर ११६/२०२३ कलम ३९२, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ हे करीत आहेत. निश्चितच लवकरच आम्ही आरोपीच्या मुद्देमालासह मुसक्या आवळून जेरबंद करू असे ठाणे प्रभारी सपोनी चंद्रकांत गोसावी आणि सपोनी भार्गव सपकाळ यांनी सांगितले.

Exit mobile version