नवी दिल्ली । दिनांक ३१।
‘पुण्यश्लोक’ हा सन्मान फक्त अहिल्यादेवी होळकर यांनाच मिळाला, त्या कुशल व साहसी योध्दा होत्या. धर्माचे रक्षण आणि महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या विचारांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. मी राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे यश हे त्यांच्याच प्रेरणेमुळे मिळाले अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
पुण्यश्लोक महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची २९८ व्या जयंतीनिमित्त आज लोधी मार्गावरील सत्यसाई ऑडिटोरियम येथे एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचं उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आदींसह देशभरातून नेते यावेळी उपस्थित होते.
अहिल्याबाई होळकर यांचं आयुष्य इतरांना प्रेरणा देणारं होतं. त्यांच्यावरील ‘कर्मयोगिनी’ पुस्तकातूने मी प्रभावित झाले. त्या माझ्या आदर्श आहेत. मी मंत्री असताना जलयुक्त शिवार योजना राबवली, ती प्रचंड यशस्वी झाली, इतर राज्यांनी त्या योजनेचं कौतुक केलं, हया सर्वामागे त्यांचीच प्रेरणा होती असं पंकजाताई यावेळी म्हणाल्या. अहिल्यादेवी हया एक धाडसी योध्दा होत्या. त्या काळात धर्म रक्षणासाठी अनेक ठिकाणी त्यांनी महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जातीभेद नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई हे एका जातीपुरते मर्यादित नव्हते. मागास समाजाला पुढे आणण्यासाठी त्यांनी उभे आयुष्य वेचले, त्यांचा आदर्श घेऊन आजच्या पिढीने वाटचाल करावी असं पंकजाताई म्हणाल्या.
जानकरांच्या संकल्पाला शुभेच्छा
महादेव जानकर माझे बंधू आहेत. लोकनेते मुंडे साहेबांचे ते मानसपुत्र आहेत, ते खूप मोठे व्हावेत यासाठी माझ्या त्यांना नेहमीच शुभेच्छा असतात. मुंडे साहेबांनी त्यांना शब्द दिला होता, त्यांना आमदार, कॅबिनेट मंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेतला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून देशभरात काम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे, त्याची सुरवात आजपासूनच त्यांनी करावी असं पंकजाताई यावेळी म्हणाल्या. यावेळी रासपच्या वतीनं काठी आणि घोंगडी देऊन पंकजाताईंचा पारंपरिक पध्दतीने सत्कार करण्यात आला.
••••