Site icon लोकाशा-बंब न्यूज

दिव्यांग पूर्व तपासणी शिबीरास अंबाजोगाईत उत्स्फूर्त प्रतिसाद; ५५३ दिव्यांग व्यक्तींची झाली तपासणी


अंबाजोगाई – बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या पुढाकारातून जिल्हाभरात सुरु असलेल्या मोफत दिव्यांग पूर्व तपासणी शिबीरास अंबाजोगाईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आ. नमिता मुंदडा यांच्या नियोजनाखाली राबविण्यात आलेल्या शिबिरात ५५३ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी गरजू दिव्यांग व्यक्तींना लवकरच मोफत उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारचे सामाजिक न्याय मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभाग, बीड जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खा. प्रीतमताई मुंडे यांच्या पुढाकारातून बीड जिल्ह्यात सर्वत्र दिव्यांग पूर्व तपासणी शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. केज मतदार संघातील शिबिरांच्या नियोजनाची जबाबदारी आ. नमिता मुंदडा यांच्यावर सोपविण्यात आली होती. केज मधील शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर सोमवारी (दि.२९) अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात तब्बल ५५३ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर उपकरणांची आवश्यकता असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची योग्य ती मोजमापे घेण्यात येऊन नोंद करण्यात आली असून या सर्व दिव्यांगांना लवकरच मोफत उपकरणे पुरविण्यात येणार असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली. या शिबिरासाठी स्वाराती रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, अधीक्षक डॉ. राकेश जाधव, ईएनटी विभाग प्रमुख प्रशांत देशपांडे, डॉ. वासुदेव नेहरकर, डॉ. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, मेट्रन भताने मॅडम, माजी उपनगराध्यक्ष महादू मस्के, प्रशांत आदनाक, अतुल कसबे यांच्यासह सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

खा. प्रीतमताई मुंडे यांची शिबिरास भेट

खा. प्रीतमताई मुंडे यांनी सोमवारी दुपारी शिबिरास भेट दिली.  दिव्यांगांची आस्थेवाईकपणे चौकशी कर खा. मुंडे यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तपासणीपासून एकही दिव्यांग वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दरम्यान, खा. मुंडे यांनी उपस्थिती कार्यकर्त्यांसोबत देखील यावेळी चर्चा केली. 

चहा-नाश्त्याची सोय

सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे शिबिरात येणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही कारणास्तव उन्हात जावे लागू नये याची काळजी शिबिरात घेण्यात आली होती. दिव्यांग व्यक्ती आणि सोबत आलेल्या नातेवाईकांसाठी शिबीर स्थळी नाश्ता, चहा आणि थंड पाण्याची सोय करण्यात आली होती. नियोजनबद्ध शिबिरासाठी दिव्यांग व्यक्तींनी खा. प्रीतमसाई मुंडे आणि आ. नमिता मुंदडा यांचे आभार मानले.

Exit mobile version