Site icon लोकाशा-बंब न्यूज

बिगर नंबरी हायवा माताळले, वाळू माफियाच्या हायवाने कलेक्टरांच्या गाडीला कट मारला, बॉडीगार्डला जिवे मारण्याचा प्रयत्न, एसपींनी हायवा चालकाला ठोकल्या बेड्या,गेवराई ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल, हायवा जप्त


बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात वाळू माफियांची मस्ती चांगलीच वाढली आहे, पैसे कमविण्यापुढे त्यांना कशाचेच भान राहत नाही, मस्तीत असलेल्या अशाच एका माफियाने मागच्या दोन दिवसांपुर्वी कलेक्टर दिपा मुधोळ यांच्या गाडीचा कट मारला, यावेळी त्या हायवा चालकाने बॉर्डगार्डला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कलेक्टरांच्या गाडीला कट मारणार्‍या या वाळू माफियाची मस्ती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी उतरविली आहे. याबाबत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सदर हायवा जप्त करून हायवा चालविणार्‍याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बिगर नंबर वाले चांगलेच माताळले असल्याचे यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांचे बॉडीगार्ड अंबादास सुरेश पावणे (पोलीस शिपाई) यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 मे 2023 रोजी रात्री जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या औरंगाबाद येथून बीडकडे येत होत्या, पहाटे 3.12 मिनिटांच्या सुमारास गडी जवळ एक हायवा वाळूने भरलेल्या पिवळ्या रंगाचा त्याच्या पाठीमागे गाडीचा नंबर टाकलेला नव्हता आला, तो शासकीय वाहनाच्या समोर दिसल्याने त्यास जिल्हाधिकार्‍यांनी थांबविण्याचे सांगितले, त्यानुसार मी व शासकीय वाहन चालक सुनील मस्के यांनी गाडीचा काच खाली करून त्यास थांबवण्याचा इशारा केला. परंतु तो थांबत नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी आपली गाडी त्यांच्या गाडीच्या समोर घ्या, असे सांगितले, आम्ही शासकीय वाहन त्याच्या गाडीच्या समोर घेतले असता, त्याने त्याचे वाहन स्पीड कमी करण्याऐवजी त्यांनी स्पीड जास्त वाढवली, त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी आपले वाहन बाजूला घ्या, असे सांगितले. आम्ही वाहन बाजूला घेत त्याचा पाठलाग सुरू केला, मादळमोहीकडे जाणारा ब्रिज आल्यावर वाळूने भरलेला हायवा त्या ब्रिज खालून मादळमोहीकडे वळाल्याने आम्ही परत त्याचा पाठलाग सुरू केला. ब्रिजपासून तो हायवा मादळमोहीच्या जवळ आल्यानंतर अलीकडे डाव्या बाजूला वळला, त्यामुळे आम्ही सुद्धा आमचे वाहन त्याच्या पाठीमागे घेतले, मादळमोही अलीकडे वळालेल्या ठिकाणापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर लहान पुलाच्या जवळ त्याने त्याच्या हायवामधील वाळू रस्त्याच्या मधोमध पलटी केली, त्यामुळे आम्ही त्याचा पाठलाग करत असताना आमची गाडी त्या वाळूच्या ढिकार्‍याच्या पुढे जात असताना वाळूच्या ढिकार्‍यावर फसून बसली तेवढ्यात मी शासकीय गाडीचा दरवाजा उघडून, त्यावेळी हायवाची स्पीड कमी असल्याने हायवाच्या ड्रायव्हरच्या बाजूने पाठीमागे पळत जाऊन गाडीच्या हँडलला उजव्या हाताने पकडले व पाय ठेवून ड्रायव्हरच्या बाजूने वर चढलो त्यावेळी मी हायवा वाहन चालकाला गाडी थांबव म्हणत होतो परंतु तो मला म्हणाला की साहेब खाली उतरा नाहीतर तुमच्या बाजूने बाभळीच्या झाडावर तुम्हाला आदळतो, त्यावेळी थांबवण्याऐवजी स्पीड वाढवून हायवा पळवू लागला त्यावेळी सुद्धा तो कोणाला तरी त्याच्या मोबाईलवरून बोलत होता, समोरून बाजूने काटेरी बाभळीचे झाड आल्याने मी झाडावर माझा जीव जाईल या उद्देशाने धडकित असताना माझ्या उजव्या हाताला बाभळीच्या झाडाचे काटे लागले आणि मी खाली पडलो, त्यावेळी मी वाळूच्या ढिगार्‍यापासून अंदाजे तीन किलोमीटर लांब आलो होतो, वाळूचा हायवा ईटकुर मार्गे पुढे गेला. सदर हायवा हा भारत बेंझ कंपनीचा पिवळ्या रंगाचा होता. तो हायवा चालक काळा सावळा बनियनवर गाडी चालवूत होता. त्यानंतर मी वाळूच्या ठिकाणी आलो, झालेला प्रकार जिल्हाधिकारी मॅडम यांना सांगितला. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी याची माहिती पोलीस अधीक्षकांना दिली. त्यानंतर पहाटे तीन पंचवीस वाजण्याच्या दरम्यान गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस आले, त्यांच्या मदतीने जिल्हाधिकार्‍यांचे वाहन ट्रॅक्टर लावून काढण्यात आले. अशा प्रकारच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणि जीव जाईल या उद्देशाने जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचा भा. द.वी. 307,353 प्रमाणे गुन्हा गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कटाक्षाने लक्ष घालून त्याची गंभीर दखल घेतली आणि स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देऊन तातडीने त्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी आदेशित केले,त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत सदरचा आरोपी नामे प्रकाश सुधाकर कोकरे (वय 27 वर्षे राहणार बागपिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड) (वाहन चालक) याचा गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून कसोशीने त्याला ताब्यात घेतले.आणि त्याच्याकडून सदरचा गुन्ह्यातील हायवा ट्रक (क्रमांक एम एच 23 Aण 6786) जप्त केला आहे. सदर प्रकरणांमध्ये पोलीस अधीक्षक बीड यांनी गंभीर दखल घेतली असून अशा प्रकारची माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही असे संकेत दिले आहेत. सदरील कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने पो उप नी संजय तुपे, पो उप नी श्रीराम खटावकऱ, पोह कैलास ठोंबरे, पो. ह.शेख नशीर, पो. ह. अशोक दुबाले, पो ह राहुल शिंदे, पो.ह. गणेश मराडे, पो. ह. बाळासाहेब जायभाय, पो.ह. मारुती कांबळे, पो.ह. भारत यादव, पो.ह. संजय जायभाय यांनी केली.

कलेक्टरांमधील डॅशींगपणा
जिल्ह्याने पाहिला
वाळूच्या टिप्परने कट मारल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्याच वेळी कडक अ‍ॅक्शन घेतली, कशाचीही भिती न बाळगता यावेळी त्यांनी त्यांच्या चालकाला सदर हायवाचा पाठलाग करून पकडण्यास सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या चालकाने त्या हायवाचा पाठलाग केला, पाठलाग करण्याचा हा थरार जवळपास अर्धा तास चालला, जिल्हाधिकारी किती आणि कशा डॅशिंग आहेत हेच यातून खर्‍या अर्थाने स्पष्ट झाले.

चाळीस हायवा तापसले
जिल्हाधिकार्‍यांच्या गाडीला कट मारणार्‍या हायवा आणि चालकाला पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कडक अ‍ॅक्शन घेतली, त्यानुसार त्यांनी चार पथके तैनात केले, यावेळी त्या पथकांनी जवळपास चाळीस हायवा तापसले. यावेळी टिप्परवरील एका स्टिकरवरून जिल्हाधिकार्‍यांच्या बॉडीगार्डने सदर टिप्पर आणि चालकाची ओळख पोलिसांना पटवून दिली.

माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही – नंदकुमार ठाकूर
जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी आणि माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा माफियांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version