बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला 30 मे रोजी नऊ वर्षे पुर्ण होत असुन, जगाच्या पाठीवर यशस्वी नेतृत्व म्हणून त्यांचा सर्वत्र गौरव होत आहे. सामान्य माणुस हाच विकासाचा केंद्र दृष्टीक्षेपात ठेवुन नऊ वर्षात केलेली गौरवशाली कामगिरी बीड लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून हाती घेतलेले मोदी 9 महा जनसंपर्क अभियान लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करून दाखवु, असा विश्वास जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी व्यक्त केला.
दरम्यान बीड जिल्हा कार्य समिती बैठकीसाठी राष्ट्रीय स्तरावरून आलेले उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री खा. तिरथसिंगजी रावत यांनी बोलताना सांगितले की, मोदीजींनी सामान्य लोकांना विकासाच्या प्रक्रियेत आणले असुन अवघ्या नऊ वर्षात आतंकवादासारखे विषय कुशलतेने सोडवले. देशातील प्रलंबित प्रश्न आणि विकासाची चळवळ हाती घेवुन शेवटच्या माणसाच्या घरापर्यंत विकासगंगा पोहोचवली. कार्यकर्त्यांनी आगामी काळात लोकांच्या दारात जावुन केंद्र सरकारने राबवलेल्या योजनेची माहिती द्यावी असे आवाहन उत्तराखंड माजी मुख्यमंत्री खा.तिरथसिंग रावत यांनी केले. हॉटेल ग्रँड यशोदा येथे आयोजित केलेल्या जिल्हा कार्य समितीच्या बैठकीत मान्यवर बोलत होते. यावेळी मध्यप्रदेश पर्यटन विभागाचे अध्यक्ष मा.विनोद गोठीया, अभियान प्रभारी डॉ.अजित गोपछडे, आ.सुरेश धस, आ.नमिताताई मुंदडा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, आर.टी.देशमुख, भीमराव धोंडे, आदिनाथराव नवले, सर्जेराव तांदळे, नंदुशेठ मुंदडा, डॉ.स्वरूपसिंह हजारी आदी मान्यवरांसह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रतिमा पुजनाने बैठकीचा प्रारंभ झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार कार्यसमितीच्या वतीने संपन्न झाला. प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंनी बैठकीची रूपरेषा सादर करून हे अभियान बीड लोकसभा मतदारसंघात यशस्वी करून दाखवण्याचा संकल्प केला. आ.सुरेश धस यांच्या भाषणानंतर प्रदेश उपाध्यक्ष तथा अभियान प्रभारी डॉ.गोपछडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या स्वभावातला साधेपणा दाखवत मला प्रभारी म्हणु नका. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी राजकारणात प्रवेश केला.संघटनात्मक कार्य कसं केलं पाहिजे त्यांच्याकडून मिळालेले आपण सैनिक असुन अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात खा.प्रितमताईंनी सुरूवातीलाच संघटनात्मक कामाचा आढावा घेवुन प्रत्येक कार्यकर्त्याला अभियान यशस्वी कसे होईल हे ठणकावुन सांगितले. सोशल मिडिया, प्रसार माध्यम तथा विकास योजनेची माहिती या संदर्भात त्यांनी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांचे प्रात्यक्षिक घेतले. प्रभावीपणे सोशल मिडियाचा वापर करा. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य लोकांना पटवून देण्यासाठी जनसंपर्क तितकाच महत्वाचा आहे. आपल्या देशाला नरेंद्रजी मोदी यांच्या रूपाने लाभलेले पंतप्रधान ज्यांची ख्याती विश्वगुरू म्हणून जगाच्या पाठीवर पसरली. 30 मे ते 31 जुन या काळात जिल्हाभरात संघटनात्मक महा जनसंपर्क अभियान एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरे करताना ग्रामीण तथा शहरी भागात कार्यकर्त्यांनी घरोघरी जावुन लोकांना योजनेची माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यात काम करताना वेगवेगळ्या माध्यमातुन जनतेच्या संपर्कात असतो पण संघटनात्मक काम आणि त्याची जबाबदारी खर्या अर्थाने लोकांच्या पर्यंत घेवुन जाण्यासाठी निमित्त ठरते. यावेळी मध्यप्रदेशहुन आलेले मा.विनोदजी गोठीया यांनी देखील कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.देविदास नागरगोजे यांनी केले तर भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी महा जनसंपर्क अभियानाची सविस्तर माहिती सादर केली. श्री चंद्रकांत फड यांनी आभार प्रदर्शन केले. बैठकीला जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, सर्व मोर्चे आघाडी प्रमुख, मंडल अध्यक्ष, विधानसभा प्रमुख आदींची उपस्थिती होती.