Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा.प्रितमताई मुंडे यांना दिव्यांगांचे उदंड आशीर्वाद, पहिल्याच दिवशी तपासणी शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, निराधारांचे कष्ट कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध : खा. प्रितमताई मुंडे

बीड । दि. २३ ।
सामाजिक न्याय विभाग व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराचे उदघाटन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.बीड शहर आणि तालुक्यातील असंख्य दिव्यांग बांधवांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून खा.प्रितमताई मुंडे यांना उदंड आशीर्वाद दिले.

जिल्हा रुग्णालयात पार पडलेल्या दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराच्या उदघाटनाला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, समाज कल्याण अधिकारी रवींद्र शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, रा.स्व. संघाचे पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की “वंचित दुर्लक्ष घटकांच्या सेवेचा वसा आणि वारसा घेऊन आम्ही वंचितांच्या उत्थानासाठी काम करत आहो. ज्यांचा कुणी आधार नाही अशा निराधारांच्या जीवनातील कष्ट कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे देखील यानिमित्ताने आभार मानते. आजच्या समाज व्यवस्थेत पोटची मुले ऐकत नाहीत, अशा पार्श्वभूमीवर निराधारांना आधार देण्यासाठी नरेंद्र मोदी हे अनेक लोकोपयोगी योजना राबवित आहेत. या योजनांमुळे समाजातील अनेकांना उभे राहण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वयंसेवकांच्या नियोजनाने शिबीर यशस्वी

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत केली. शिबिरासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांची गैरसोय होणार नाही याची दक्षता स्वयंसेवकांनी घेतली, शिबिरस्थळी नोंदणी आणि तपासणीसाठी मदत केल्यानंतर दिव्यांगांच्या अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी दिलेल्या योगदानामुळे तपासणी शिबीर यशस्वी आणि उत्स्फूर्त पार पडले.

••••

Exit mobile version