Site icon लोकाशा-बंब न्यूज

महाराष्ट्रासह दहा राज्यांत कोरोनाला हरविले तर देश जिंकेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई दि. ११: देशात एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी 80 टक्के रुग्ण दहा राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविले तर देश जिंकेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार विविध राज्यांचे मुख्य सचिव आदी उपस्थित होते.दहा राज्यांमध्ये ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण 80 टक्के आहे. या राज्यांकडून कोरोना विरुद्ध करण्यात येत असलेल्या उपाययोजनामुळे आणि अनुभवातून कोरोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही दहा राज्ये जिंकली तर देश जिंकेल असे सांगतानाच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दीष्ट असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या ७२ तासांत त्या व्यक्तीच्या निकट सहवासातील व्यक्तींचे सर्वेक्षण चाचण्या केल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सुरूवातीचे ७२तास महत्वाचे हे लक्षात घेऊनच ट्रेसींग, टेस्टींग वाढवावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.यावेळी महाराष्ट्राने केलेली कामगिरी मांडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना बाधित आणि मृत्यू झालेली एकही रुग्ण लपवला नाही. पारदर्शीपणे माहिती दिली. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भीती तर अनेकांमध्ये काही ही होत नसल्याचा निष्काळजीपणा आहे तर पोटासाठी बाहेर पडण्याची मजबूरी देखील आहे अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ पाच रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय देखील राज्यशासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्या लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. “इमिनॉलॉजी लॅबची संख्या वाढविण्याची गरज आहे. विविध प्रकारच्या विषाणूंचा उद्भव कसा आणि का होतो? यावर संशोधन करण्याची गरज आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध आहेत. मात्र या सुविधांसाठी डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची गरज आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

Exit mobile version