बीड ।दिनांक १६।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी हज यात्रेकरूंच्या निर्माण झालेल्या प्रश्वांवर केंद्रानंतर आता राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. हज यात्रेच्या सुरवातीच्या प्रवासाचे ठिकाण बदलणे शक्य नसल्यास त्यांच्या अतिरिक्त प्रवास खर्चाची तरतूद सरकारने करावी अशी मागणीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे की, हज यात्रा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असते. महाराष्ट्रातून हजारो भाविक यात्रेला जात असतात. या यात्रेला जाण्याकरिता भाविकांना मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळ असे पर्याय देण्यात आले आहेत. परंतु छ. संभाजीनगर विमानतळ येथून प्रवास करण्यासाठी यात्रेकरूंना अतिरिक्त ८८ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत प्रवासाचे ठिकाण बदलणे शक्य नसल्यास राज्य सरकारने अतिरिक्त प्रवास खर्चाची रक्कम देण्याची तरतूद करावी.
मी यापूर्वीच हज कमिटी ऑफ इंडिया, नागरी उड्डाण मंत्रालय, केंद्रीय अल्पसंख्यांक विकास मंत्रालय यांना पत्राद्वारे विनंती केली आहे, आता आपण स्वतः यात पुढाकार घेऊन मार्ग काढावा व सर्वसामान्य यात्रेकरूंचा विचार करुन आपण त्यांना मुंबई विमानतळ हा पर्याय उपलब्ध करुन द्यावा असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
••••