Site icon लोकाशा-बंब न्यूज

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर उद्याच निकाल येणार, स्वतः सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली माहिती

बीड, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपासोबत सत्ता स्थापन केली होती. यामुळे राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी झाली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्याही वकिलांनी जोरदार युक्तीवाद करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी सुनावणी आता पूर्ण झाली असून केवळ निकालाची प्रतिक्षा होती. याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज हा निकाल उद्याच लागणार असल्याचं जाहीर केलं आहे. लाईव्ह लॉ या संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावण्यांसदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, उद्या दोन घटनापीठातील महत्त्वाच्या प्रकरणी निकाल द्यायचा आहे. समलिंगी विवाहाप्रकरणी सुरू असलेली सुनावणी उद्या दुपारी १२ वाजता करण्यात यावी, कारण, उद्या सकाळीच महत्त्वाच्या सुनावण्या लिस्टिंग आहेत, असं सरन्यायाधीश यांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितलं.

या प्रकरणांची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमार झाली. या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम.शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे याप्रकरणी जलद निकाल येईल, असं बोललं जात होतं. गेल्या दोन दिवसांपासूनया निकालाच्या चर्चांना जोर आला होता. अखेर, सरन्यायाधीश यांनीच याप्रकरणी खुलासा केला आहे.

Exit mobile version