बीड(प्रतिनिधी)ज्या प्रमाणे रामभक्तांनी श्रीराम हे नाव लिहून दगड समुद्रात टाकले तर ते पाण्यावर तरंगले.भक्तीमध्ये असलेली ही शक्ती वर्षानुवर्षे पुढे चालत आहे.दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे भक्त आज गोपीनाथगडाच्या माध्यमातून भक्तीचा अपरंपार महिमा पुढे चालवत आहेत.मानूर येथे गोपीनाथगड व्हावा ही सरपंच अशोक पाखरे यांनी मांडलेली कल्पना कौतुकास्पद असून त्याला माझी मान्यता आहे असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
मानूर येथील समर्थ कालीन असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये काही दिवसापुर्वीच नव्या मुर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्या निमित्त पंकजाताई यांनी गुरुवार दि.13 एप्रिल रोजी श्रीराम मंदिराला भेट देवून विधीवत पुजा अर्चा केली.मंदिराच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर गुरुजी यांनी पंकजाताई मुंडे यांचे स्वागत केले. त्यानंतर आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, प्रभु श्रीराम हे अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत.राम नामा मध्ये जी ताकद आहे ती समाजाला सकारात्मक ऊर्जा देते. सत्संगाचा मार्ग दाखवते.रामभक्तीचा महिमा अगाध आहे. रामसेतु बांधताना भक्तांनी दगडावर केवळ श्रीराम हे नाव लिहिले तर दगड पाण्यावर तरंगले. हा मनापासून केलेल्या भक्तीचा चमत्कार आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यावर लाखो कार्यकर्त्यांनी असेच प्रेम केले. त्यांच्या निधना नंतर प्रेमाचे रुपांतर भक्तीमध्ये झाले आणि या भक्तीतून गोपीनाथगड तयार होत आहेत. मानूरचे सरपंच अशोक पाखरे यांनी मानूर गावामध्ये गोपीनाथगड करण्याची जी संकल्पना मांडली ती कौतुकास्पद असून या उपक्रमाला माझी मान्यता आणि शुभेच्छा आहेत असे पंकजाताई म्हणाल्या. मानूर येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात असलेल्या जागेत हा गोपीनाथगड उभा राहणार असून याच परिसरात श्री सिध्देश्वराचे तसेच श्री नागनाथ महाराजांचे,बजरंगबलीचे मंदिर आहे. बाजूलाच मुस्लीम धर्मियांचे श्रध्दास्थान असलेला महेबु सुभानी दर्गा आहे. अशा पवित्र परिसरामध्ये गोपीनाथगड होत असल्याचे सरपंच अशोक पाखरे यांनी या प्रसंगी सांगितले.स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य आणि आठवण गडाच्या माध्यमातून कायम प्रेरणा देत राहिल असेही ते म्हणाले. लवकरच गडाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असून सुरुवातीला उद्यान विकसित केले जाणार आहे.