Site icon लोकाशा-बंब न्यूज

इमान राखून स्वाभिमानानं लढण्याची तयारी ठेवा, पंकजाताई मुंडे यांनी साधला परळी बाजार समितीच्या मतदारांशी संवाद, ताकद, नियत आहे म्हणूनच आपण सर्व रिंगणात ; अफवा, अमिषांना बळी पडू नका

परळी वैजनाथ । दिनांक१०।
परळी बाजार समितीची निवडणुक प्रत्येकाने स्वतःची निवडणूक समजून लढायची आहे. ताकद आणि नियत असल्यामुळेच आपण सर्व रिंगणात उतरलो आहोत, तथापि, तुम्हाला इमान सांभाळून स्वाभिमानाने लढण्याची तयारी ठेवावी लागेल. परिस्थिती आपल्या बाजूने आहे, मला तुमची काळजी आहे. अफवा, अमिषाला बळी पडू नका, जीव ओतून काम करा अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मतदारांना कानमंत्र दिला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतदार व कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना पंकजाताई मुंडे बोलत होत्या. एन एच काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ही मतदार संवाद बैठक मोठया उत्साहात पार पडली.

पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, प्रत्येक निवडणुकीत हार-जीत असते. राजकारणात असा कोणताही व्यक्ती सापडणार नाही की त्याला पराभवाला सामोरे जावे लागले नाही. तुम्ही एकदा गमावून बघितलं आहे, त्याचा परिणाम मतदारसंघाच्या, जिल्हयाच्या आणि राज्याच्या राजकारणावर झालेला देखील पाहिला आहे. पण आता त्यासाठी तुम्हाला इमान गहाण न ठेवता काम करावं लागेल. उमेदवारी अर्ज भरताना तुमच्यात असलेला प्रचंड उत्साह मला दिसला. लढण्याची ताकद आणि नियत आहे म्हणूनच आपण रिंगणात उतरलो आहोत. सोसायटीसह सर्वच जागांवर परिस्थिती चांगली आहे. कोणाची किती ताकद आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे तरी देखील एक एक मत जो वाढवेल तो माझा खरा कार्यकर्ता असेल. तुमची मला काळजी आहे, कोणत्याही अफवा, अमिषाला बळी न पडता आपली खुंटी मजबुत करा, काहीही झालं तरी ताईला सोडणार नाही अशी प्रतिज्ञा घ्या असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केलं.

माझी निष्ठा फक्त तुमच्यावर

आजकाल कुणी काहीही स्टेटमेंट करत आहे, त्याकडे लक्ष देऊ नका. ही निवडणूक पक्षाची नाही. दहा वीस पक्ष फिरून आलेले लोक माझ्या पक्ष निष्ठेवर बोलतात, आश्चर्य वाटतं. माझी निष्ठा फक्त तुमच्यावर आहे, तुमच्यासाठी वाट्टेल ते करायची माझी तयारी आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, रमेश कराड, दिलीप बिडगर, उत्तम माने, श्रीराम मुंडे, राजेभाऊ फड, निळकंठ चाटे, राजेश गिते, प्रदीप मुंडे, व्यंकटराव कराड, साहेबराव चव्हाण, संतोष सोळंके, सुधाकर पौळ आदींसह तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकीचे संचलन रवि कांदे यांनी केले.
••••

Exit mobile version