बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : आपण समाजाचे काही तरी देणे लागतो हा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे काम उभा केले आहे, त्यांनी हाती घेतलेल्या या कामाला बीड जिल्ह्यात गती देण्याचे काम नाम फाऊंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके आणि जिल्हा समन्वयक कृषीभुषण शिवराम घोडके हे करत आहेत. कोरोनानंतर पुन्हा एखदा बीड जिल्ह्यात नाम फाऊंडेशन मोठ्या जोमाने कामाला सुरवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चाळीस गावातील नद्यांचे खोलीकरण, रूंदीकरण आणि सरळीकरण केले जाणार आहे. यातील काही कामे सुरू आहेत तर काही कामे सुरूही होणार आहेत. विशेष म्हणजे बीडमध्ये बिंदुसरा नदीवर चार किमी अंतराचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामातून बिंदुसरा नदीचे रोल मॉडेल तयार झाल्याचे भविष्यात पहायला मिळणार आहे. दरम्यान नाम फाऊंडेशनने जिल्ह्यात हाती घेतलेल्या या प्रत्येक कामाला जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्याकडून खंबीरपणे साथ मिळत आहे. गावागावातील कामांना जिल्हाधिकार्यांच्या हस्ते सुरवात होत असल्यामुळे ग्रामस्थांना मोठे बळही मिळत आहे.
दुष्काळी जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिले जाते, मागच्या पाच वर्षांपुर्वी पडलेल्या दुष्काळामुळे बीड जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले होते, निर्माण झालेली हीच भिषण परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर ठेवून सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे बीड जिल्ह्याच्या मदतीला धावून आले, यावेळी त्यांनी नाम फाऊंडेशनची स्थापना करून ते दोघेही त्याचवेळी जिल्हावासियांच्या सेवेत उतरले, गावागावातील नद्यांचे खोलीकरण, रूंदीकरण, सरळीकरणाचे काम त्यांनी केले, यामुळे दुष्काळासारख्या परिस्थितीवर बीड जिल्हावासियांना खर्या अर्थाने मात करता आली, मध्यंतरी कोरोनामुळे कामे मंदावली होती, आता पुन्हा एखदा नाम फाउंडेशन बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या, ग्रामस्थांच्या सेवेसाठी पुर्ण ताकतीने जिल्ह्यात उतरले आहे, त्यानुसार जिल्ह्यातील चाळीस गावातील नद्यांचे खोलीकरण, रूंदीकरण, सरळीकरण करण्यात येणार आहे. यापैकी आतापर्यंत बारा किमीचे काम झाले आहे. यामध्ये उमापुरमध्ये चार किमी, कुमशी अडीच किमी, सिरसदेवीत अडीच किमीचे काम पुर्ण झाले आहे. चकलांबा, सिरसमार्ग/ तरडेवाडी, गोमळवाडा, केतूरा याठिकाणी काम सुरू आहे. शनिवारी तरडेवाडीत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्या हस्ते नदीच्या रूंदीकराणासह खोलीकरण आणि सरळीकरणाच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी उत्तम पाटील, सह्याद्री फाउंडेशनचे अॅड राजपुरोहित, नाम फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके, जिल्हा समन्वयक कृषीभूषण शिवराम घोडके यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विशेष म्हणजे लवकरच बीडमध्ये बिंदुसरा नदीचे खोलीकरण, रूंदीकरण आणि सरळीकरण केले जाणार आहे. याठिकाणी चार किमीचे काम केले जाणार आहे. यामुळे भविष्यात बिंदुसरा नदी रोल मॉडेल ठरणार आहे. दरम्यान नाम फाऊंडेशनने हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्याकडून खंबीरपणे साथ मिळत आहे. उभा राहत असलेल्या या कामांमुळे भविष्यात जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे.
नदी-नाल्यांच्या कामासाठी ग्रामस्थांनी
पुढाकार घ्यावा : शिवराम घोडके
सिनेअभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि राजाभाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नाम फाउंडेशन अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये नदी खोलीकरण, सरळीकरण आणि विस्तारीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेवराई तालुक्यात नाम फाउंडेशन, शारदा प्रतिष्ठान आणि लोकसभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे. या अनुषंगाने नाम फाऊंडेशन अंतर्गत गावातील नदी-नाल्याच्या कामासाठी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक शिवराम घोडके यांनी केले आहे. ही कामे नाम फाऊंडेशन आणि लोकसहभागातून पुर्ण केली जाणार असल्याचे घोडके यांनी म्हटले आहे.