शिरूर/पाटोदा । दि. ०८ ।
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव आणि पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात शुक्रवार ( दि.०७ ) रोजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर जल’ या संकल्पनेतून ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे, या योजनेमुळे ग्रामीण भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य संपण्यास मदत होणार असल्यामुळे आपण योजनेच्या कामावर लक्ष देऊन असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
शिरूरच्या घाटशीळ पारगाव इथे एकूण सहा कोटी ऐंशी लक्ष रुपयांच्या विकास कामांचे उदघाटन आणि लोकार्पण व भायाळा इथे दोन कोटी त्रेसष्ट लक्ष रुपयांच्या जलजीवन योजनेच्या कामाचा शुभारंभ खा.मुंडे यांनी केला. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.
ग्रामीण भागातील नागरिकांची विशेषतः महिलांची वणवण थांबावी, त्यांना नळाद्वारे घरापर्यंत शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अपेक्षा होती. यासाठी त्यांनी ‘हर घर नल से जल’ संकल्पना राबवून जलजीवन मिशन मार्फत ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणारी योजना सुरू केली. या योजनेमुळे पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने आपण या कामात लक्ष देऊन आहोत. पाणी पुरवठ्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी मी प्रयत्नशील आहे. कामात गैरप्रकार किंवा अनियमितता आढळून आली तर ग्रामस्थांनी ही बाब निदर्शनास आणून द्यावी. जलजीवन मिशनचे काम दर्जेदार करून घेण्याची जवाबदारी ग्रामस्थांची देखील आहे. सदरील कामांची आपण वेळोवेळी पाहणी करणार असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या “बीड जिल्ह्याच्या जनतेने आम्हाला सेवेची संधी दिली आहे, विकास कामांच्या माध्यमातून आम्ही तुमची सेवा करत आहोत. याकामी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद अबाधित राहिले तर पुढील काळात जनतेच्या हिताची कामे करत राहू. ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न देखील पुढील काळात सोडविणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी उपस्थितांना दिली.
•••••