बीड, दि. 8 : बीड जिल्ह्यातील नऊ बाजार समित्यांच्या निवडणूकीचे वातावरण चांगलेच पेटले आहे. विशेष म्हणजे जिल्हास्तरावरील बीड बाजार समितीमध्ये बदल घडविण्यासाठी शेतकरी महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे, याअनुषंगानेच या आघाडीचे नेत्यांनी बीड बाजार समितीमध्ये चाललेल्या कारभाराचा पत्रकार परिषदेमधून पर्दाफाश केला आहे. व्यापारी मतदार संघातील सव्वा तिनशे मतदानापैकी शंभर मतदान हे एकाच कुटूंबातील असल्याचा खळबळजणक दावा आ. संदिप क्षीरसागर यांनी केला आहे, विशेष म्हणजे जालन्यातील लोकांची नावे बीड बाजार समितीच्या मतदार यादीमध्ये कसे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सत्तेच्या माध्यमातून शेतकर्यांना लुटणार्यांना या निवडणूकीत खाली खेचून बीड बाजार समितीवर शेतकरी महाविकास आघाडीचा झेंडा फडकविणार असल्याचा विश्वास यावेळी आ. संदिप क्षीरसागर यांनी बोलून दाखविला आहे. येथील शासकिय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते, यावेळी त्यांनी बीड बाजार समिती जर आपल्या ताब्यात आली तर आम्ही शेतकर्यांसाठी कसा आणि काय काय बदल करू याविषयी अजेंडा पत्रकारांसमोर ठेवला. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, सुशिलाताई मोराळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आ. सय्यद सलीम, अशोक हिंगे, रवि दळवी, धनजय गुंदेकर, वंचितचे श्री. खाडे, गणेश बजगुडे, मस्के, घुमरे, महादेव धांडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. दरम्यान ही निवडणूक जिंकण्यासाठी आ. संदिप क्षीरसागरांनी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना एकत्र करून त्यांची वज्रमुठ बांधली आहे.