Site icon लोकाशा-बंब न्यूज

पानिपतच्या लढाईचा बदला बीडच्या भूमीत

बीड, दि.11 (लोकाशा न्युज) ः इतिहासाच्या सर्व कालखंडात बीड जिल्ह्याला विलक्षण महत्त्व आहे. दि. 10 ऑगस्ट 1763 रोजी मराठी फौज आणि निजामशाहीमध्ये राक्षसभूवनला झालेली लढाई मराठ्यांच्या इतिहासातलले अत्यंत महत्त्वाचे पान असून पानिपतच्या पराभवाचा बदला मराठी फौजेने राक्षसभूवनच्या लढाईत विजय मिळवून घेतला. या विजयाने मराठी फौजेत आत्मविश्वास निर्माण झाल्याचे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. सतीश साळुंके यांनी केले. इतिहास संकलन संस्था देवगिरी प्रांतच्या बीड शाखेच्या वतीने राक्षसभुवन लढाईच्या निमित्ताने दि. 10 ऑगस्ट हा दिवस इतिहास दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचे प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. साळुंके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस आर टी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदशिव दंदे होते. वेबिनारचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रशांत साबळे यांनी केले. साळुंके पुढे म्हणाले की, ही लढाई माधवराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली प्राणपणाने लढले गेली. रघुनाथरावांनी मतभेद विसरून या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने निजामाला भर पावसात राक्षसभूवनच्या गोदावरीकाठी घेरले व चहू बाजूने हल्ला करून त्याचा पराभव केला. या लढाईत पेशव्यांना कडून निजामानेला जाऊन भेटलेला विठ्ठल सुंदरचा पेशव्यांनी खात्मा केला. लढाई निजामाचे महत्त्वाचे सरदार तसेच तब्बल चार हजार सैनिक युद्धकैदी झाले तर कित्येक उंट, हत्ती व दारूगोळा मराठी फौजेचा हाती सापडला. महत्त्वाचे म्हणजे उदगीरच्या लढाईत गेलेला मुलुक मराठ्यांना परत मिळाला. पानिपतच्या लढाईत झालेल्या पराभवाचा बदला मराठी फौजेने बीड जिल्ह्याच्या भूमीत घेतला व पुन्हा भगवा फडकत राहिल हा आत्मविश्वास मराठी फौजेला मिळाला. आपल्या दोन तास चाललेल्या ऑनलाइन व्याख्यानात डॉ. साळुंके यांनी बीड जिल्ह्यावर इसवीसन पूर्व काळापासून ते स्वातंत्र्यापर्यंत असणार्‍या विविध राजवंश आणि राजवटींचा ओजस्वी शब्दात आलेख मांडला वेबिनारचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. रवी सातभाई यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. गणपत गट्टी यांनी केले या ऑनलाईन वेबिनार मध्ये प्रा.डॉ. राधाकृष्ण जोशी यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील इतिहास संकलन समिती चे पदाधिकारी, इतिहासाचे प्राध्यापक, शिक्षक, इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. प्रा. शशिकांत पसारकर यांनी वेबिनारची तांत्रिक बाजू सांभाळली

Exit mobile version