Site icon लोकाशा-बंब न्यूज

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे, 29 मार्च : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. प्रकृती अधिक खालावल्याने गिरीश बापट यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता वैकुठं स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

काही वर्षांपासून गिरीश बापट हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. यामुळे गेल्या काही महिन्यात ते सक्रीय राजकरणापासून दूर होते. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी प्रकृती ठीक नसतानाही ते मैदानात उतरले होते. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावत चालली होती. गिरीश बापट यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. मात्र बुधवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गिरीश बापट यांनी जवळपास ३० वर्षे कसबा मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर सध्याचे पुणे शहराचे ते विद्यमान खासदार होते. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारा नेता अशी गिरीश बापट यांची ओळख आहे. गिरीश बापट हे १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. १९९६ मध्ये त्यांना भाजपने खासदारकीची उमेदवारी दिली होती. मात्र बापट यांचा काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पराभूत केलं होतं.

Exit mobile version