परळी वैजनाथ ।दिनांक १९।
मागच्या अडीच वर्षांत मतदारसंघात काय कामं झाली हे तुम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलं आहे, ते मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आता सरकार आपलं आहे, त्यामुळं काळजी करू नका माझ्या माणसांची कामं व्हावीत, गावचा विकास व्हावा यासाठी माझी तळमळ आहे, तुमचा शब्द मी खाली पडू देणार नाही असं वचन मी देते अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ग्रामस्थांना विश्वास दिला.
जलजीवन मिशन अंतर्गत मलनाथपूर येथे ५७ लाख, रामेवाडी-कासारवाडी येथे एक कोटी आणि हिवरा गोवर्धन येथे ३ कोटी ६७ लाख रूपयांच्या पाणी पुरवठा कामाचे भूमिपूजन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठया थाटात झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, रमेश कराड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, उत्तमराव माने, राजेश गिते, श्रीराम मुंडे, नगरसेवक पवन मुंडे, बिभीषण फड, जगन्नाथ मुसळे, प्रवीण फड, रामेवाडी चे सरपंच दशरथ कुकडे, हिवरा सरपंच वर्षाताई निर्मळ, वृक्षराज निर्मळ, सुधाकर पौळ, अन्वर पट्टेदार, आदी व्यासपीठावर होते.
माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात मतदारसंघात मी जेवढा निधी आणला, जी कामं झाली, ती यापूर्वी कधीच झाली नव्हती. दवाखान्यापासून स्मशानभूमी पर्यंत सर्व कामे केली. पण मागच्या अडीच वर्षांत काय कामं झाली, याचा हिशेब तुमच्यासमोर आहे. मी वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही सर्व माझी माणसं आहात, लोकनेते मुंडे साहेबांना तुम्ही तळहाताच्या फोडासारखं जपलं, त्यांच्यासारखा नेता देशाला दिला, त्यामुळं तुम्हाला जपणं, तुमची कामं करणं माझं कर्तव्यच आहे. केंद्रात व राज्यात आता आपलं सरकार आहे. गावच्या विकासाची सर्व कामं मी मार्गी लावेन. तुमचा शब्द खाली पडू देणार नाही असं वचन मी तुम्हाला देते. मतदारसंघ पुन्हा नव्याने उभारू, त्यासाठी मला दत्तक घ्या, आशीर्वाद द्या असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी ग्रामस्थांना केलं.
ग्रामस्थांचा पुन्हा तोच जोश ; पंकजाताईंच केलं जोरदार स्वागत
जलजीवन मिशनच्या माध्यमातून पंकजाताई मुंडे यांच्या विकास कामांचा झंझावात पुन्हा एकदा मतदारसंघात दिसून आला. मागील दौऱ्यासारखा तोच जोश आणि उत्साह ग्रामस्थांमध्ये होता. ठिक ठिकाणी गावागावात पंकजाताई मुंडे यांचा ग्रामस्थांनी वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत व फुलांची उधळण करत जोरदार स्वागत केलं. ग्रामस्थ मोठया संख्येने त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
••••