बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता अनेक जण शहरात ठिकठिकाणी बिनधास्तपणे बॅनर लावतात, यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा होत आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे अनेकांना छोट्या मोठ्या अपघातालाही तोंड द्यावे लागत आहे. शहरातील ही परिस्थिती लक्षात घेवून आता पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि बीड नगर पालिकेच्या सीओ निता अंधारे यांनी कडक अॅक्शन घेतली आहे. त्यामुळे आता परवानगीशिवाय शहरात कोणत्याच ठिकाणी बॅनर लावता येणार नाही, परवानगी न घेता जर बॅनर लावले तर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्यात बॅनर छापणारा, बॅनर लावणारा आणि बॅनर छापून घेणार्यांवर गुन्हा दाखल होणार आहे.
सध्याचे युग हे डीजीटलचे आहे. त्यामुळे कोणीही उठसुट स्वत:चे बॅनर छापून चमकोगिरी करण्याचे काम करीत आहेत. बीड शहरात तर अशा चमकोगिरी करणार्यांचा अक्षरक्ष: उत आला आहे. बीड शहरातील मुख्य ठिकाण असणार्या शिवाजी महाराजांच्या चौकाला तर चारी बाजूंनी दररोजच बॅनरने विळखा घातलेला असतो. या बॅनरमुळे छोटे मोठे अपघात होत आहेत. याचा प्रत्यक्ष त्रास येथून ये जा करणार्या नागरिकांना होत आहे. शहरातील इतर भागातही अशीच परिस्थिती आहे. स्वत:चे बॅनर छापून चमकोगिरी करणार्यांवर आता जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणि बीड नगर पालिकेच्या सीओ निता अंधारे यांनी कडक अॅक्शन घेतली आहे. यापुढे जर नगर पालिकेची परवानगी न घेता जर कोणी बॅनर लावले तर त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश एसपींनी आपल्या अधिकार्यांना दिले आहेत.
याअनुषंगानेच शुक्रवारी सायंकाळी एसपींनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात शहरातील बॅनर छापणार्या दुकानदारांची एक बैठक घेतली. जो तुमच्याकडे बॅनर छापायला येईल त्याने आधी नगर पालिकेची परवानगी आणली आहे का? याची चौकशी करा, जर त्याच्याकडे परवानगी नसेल तर तुम्ही कदापी बॅनर छापू नका, विना परवाना जर बॅनर छापून दिले तर थेट गुन्हा दाखल केला जाईल, एवढेच नाही तर छापणार्या बरोबरच बॅनर छापून घेणारा आणि ते बॅनर लावणार्यावरही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे या बैठकीत एसपींनी स्पष्टपणे सांगितले आहे. एसपींनी घेतलेल्या या भुमिकेमुळे आता चमकोगिरी करणार्यांवर चाप बसल्याशिवाय राहणार नाही. पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीला बीड नगर पालिकेच्या सीओ निता अंधारे, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ, बीड शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप, बीड ग्रामीणचे संतोष साबळे, शिवाजीनगरचे केतन राठोड, पेठ बीडचे एपीआय पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
अन् निता अंधारेंनी तीन दिवसांची
दिली डेडलाईन