Site icon लोकाशा-बंब न्यूज

कांदा उत्पादकांना सरकार पावले, शेतकऱ्यांना मिळणार प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

मुंबई- राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला एक रुपया किलोचा भाव मिळत असल्याने मागील आठवड्यात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की,कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार आता प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे. २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, पण आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी कांद्याच्या प्रश्नावरुन पुन्हा एकदा सरकारला जाब विचारला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भारताच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ४३ टक्के वाटा हा आपल्या राज्याचा आहे.”
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “बाजारात लाल कांद्याची आवक जास्त आहे. देशातल्या इतर राज्यांमध्ये उत्पादन वाढलं आहे. मात्र कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळेच आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती नेमली. यामध्ये निर्णय झाल्याप्रमाणे आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देत आहोत. २०० रुपयेची शिफारस होती, पण आम्ही ३०० रुपये देत आहो

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शेतकऱ्याच्या कांद्याला एक रुपये किलोचा भाव मिळाल्याचा प्रश्न माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यानंतर विरोधी पक्षांनी या प्रश्नावर सरकारला जाब विचारला होता.मागील आठवड्यात बीड तालुक्यातील शेतकऱ्याने कांद्याला भाव मिळत नसल्याने आत्महत्या केली होती. यावर देखील विधिमंडळात बरीच चर्चा झाली होती.

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केल्याने शेतकरी आनंदित झाला आहे.

Exit mobile version