परळी वै – एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार नंदागौळ (ता. परळी) येथे आज दुपारी १२.३० च्या सुमारास घडला. विशेष म्हणजे सदरील अल्पवयीन मुलगी दहावीच्या वर्गात शिकत असुन तिचा आज बोर्डाचा पेपर होता. तरीही तिचा बालविवाह उरकण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांना कळताच त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला याबाबतची कल्पना दिली. मात्र पोलीस आणि स्थानिक यंत्रणा नंदागौळ येथे पोहचण्यापूर्वीच बालविवाह उरकला होता. पोलीस आणि स्थानिक अधिकारी त्याठिकाणी दाखल होताच नवदाम्पत्यासह वऱ्हाडीही फरार झाले. दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे, पोलीस – अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच स्थानिक ग्रामसेवक परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असुन ५० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल होणार असल्याचे खळबळ उडाली आहे.
परळी तालुक्यातील नंदागौळ येथील एका १६ वर्षीय मुलीचा आज दुपारी बालविवाह झाला. सदर मुलगी इयत्ता दहावीत शिकत असुन तिचा आज गणित विषयाचा पेपर सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे होता. मात्र ती पेपरला गैरहजर होती. त्याचवेळेत तिचा बालविवाह झाला. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांना माहिती होताच त्यांनी बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासकीय यंत्रणा नंदागौळ ला पोहचण्यापुर्वीचबालविवाह झाला. तत्वशिल कांबळे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना या प्रकाराची माहिती देत नंदागौळ येथील विवाहस्थळाचे फोटो आणि व्हिडीओ पाठवले. सदरील प्रकाराचे गांभीर्य पाहुण जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश परळी ग्रामीण पोलीसांना दिले. स्थानिक ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकाडे हे दुपारी उशिरा परळी ग्रामीण ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असुन मंडपवाले, फोटोवाले यांच्यासह लग्न लावणारे आणि त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांविरूध्द गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये ५० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल होणार असल्याने खळबळ उडाली आहे.