अंबाजोगाई – केज विधानसभा मतदार संघातील देवस्थानांच्या विकास कामांसाठी आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून दहा गावांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ. मुंदडा यांनी दिली.
केज मतदार संघात अनेक प्रसिद्ध देवस्थाने आहेत. या देवस्थानांचा वाढता प्रसार लक्षात घेता या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे झाले होते. आ. नमिता मुंदडा यांनी मतदार संघातील दहा देवस्थानांच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून पर्यटन व सांस्कृतिक विभागकडून केज मतदार संघातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा देण्यासाठी दहा देवस्थानांची विकासकामे करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या देवस्थानात अंबाजोगाई तालुक्यातील खोपरनाथ मंदिर चनई, एकमुखी दत्तमंदिर देवस्थान माकेगाव, देवी मंदिर देवळा आणि केज तालुक्यातील दहिफळ वडमाउली देवस्थान, राम मंदिर युसुफ वडगाव, वाघेश्वर मंदिर वाघे बाभूळगाव, नागेशपुरी मठ संस्थान वरपगाव, धनेगाव मेसाई मंदिर धनेगाव, राम मंदिर आवसगाव आणि संत नामदेव महाराज मंदिर चिंचोली माळी या दहा देवस्थानांचा समावेश आहे. देवस्थानांच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.